Satara Medical College News : खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सातारा मेडिकल कॉलेजचे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले आहे. शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्या स्वाक्षरीने बुधवारी याबाबतचा अध्यादेश जारी केला. याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
याबाबतच्या अध्यादेशात वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी म्हटले की, 31 जानेवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार सातारा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Satara Medical college आणि संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. या कॉलेजच्या नामाधिकरण प्रस्तावाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नाव छत्रपती संभाजी महाराज Chhatrapati Sambhaji Maharaj शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा असे करण्यात आले आहे .
त्या अनुषंगाने आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी तात्काळ याप्रमाणे कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. हा अध्यादेश साताऱ्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विभागीय आयुक्त पुणे, औषधी द्रव्य विभागाचे सहसचिव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता यांना कळविण्यात आला आहे.
कृष्णा नगर येथे सातारा मेडिकल कॉलेजची इमारतीचे काम सध्या जोरात सुरू आहे पहिल्या टप्प्यांमध्ये 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाचे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करावे ही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती.
त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सर्वप्रथम साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती. उदयनराजे भोसले यांनी दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात केंद्रीय वैद्यकीय मंत्री भारती पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुद्धा याबाबतचा पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने वैद्यकीय संचालनालयाला पुढील कार्यवाही करायचे निर्देशित केले आहे. सातारा मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आभार मानले आहेत.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.