अकोले ( जि. अहमदनगर ) - अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या कारखान्यावर माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांची अनेक वर्षांपासून सत्ता आहे. निवडणुकीपूर्वी पिचड पिता-पूत्र नको म्हणून परिवर्तन पॅनल काढणारे शेतकरी नेते दशरथ सावंत, बी. जे. देशमुख व जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी आज अचानक पिचडांच्या पॅनलला समर्थन जाहीर केले. Agasti Sahakari Sakhar Karkhana News Update
मधुकरराव पिचड यांच्या या राजकीय डावामुळे या निवडणुकीत पिचडांचे पारडे जड झाले आहे. आता पिचडांच्या विरोधात केवळ महाविकास आघाडीचेच आव्हान उरले आहे. परिवर्तन पॅनलने आपला निर्णय जाहीर करण्यासाठी मधुकरराव पिचड यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी माझी मंत्री मधुकरराव पिचड, माजी प्रशासकीय अधिकारी बी.जे.देशमुख, शिवसेनेचे नेते बाजीराव दराडे, वकील भाऊसाहेब नवले, सुधाकर देशमुख, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव आदी उपस्थित होते.
दशरथ सावंत म्हणाले, परिवर्तन पॅनलने निवडणुकीत माघार घेतली आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या शेतकरी विकास पॅनलला आम्ही विनाशर्थ पाठिंबा देत आहे. माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखाली अगस्ती चांगला चालेल अशी आम्हाला खात्री आहे. भविष्यात आमच्या सूचनांचा आदर करून कारभार केल्यास शेतकरी कामगारांना न्याय मिळेल असे सावंत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, दुष्ट प्रवृत्तीचे कारखान्याला लागलेले ग्रहण आणि तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिमेला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी आमच्या सर्व मान प्रतिष्ठा बाजूला ठेवून आम्ही या निर्णयाप्रत आलो आहे. शेतकरी विकास मंडळाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा देताना कोणत्याही अटी, शर्थी न ठेवता पाठिंबा दिला आहे. मात्र आमच्या काही सूचना अगस्तीच्या हिताच्या असतील त्याचा स्वीकार करून निर्णय घ्यावा असे आम्ही मधुकर पिचड यांना सांगितले असून त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे, असे त्यांनी सांगितले.
बी. जे. देशमुख म्हणाले, आमची भूमिका व्यवस्था परिवर्तन होऊन शेतकरी सभासद, कामगार याना न्याय देता येईल. अगस्तीवर झालेल्या कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. यासाठी गेली तीन वर्षे आम्ही झटत होतो मात्र अपप्रवृत्ती आमचे हे आंदोलन मोडित काढण्यासाठी प्रयत्नशील होते. अलीकडे दोन पॅनल उभे असून एका बाजूला सीताराम गायकर, आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे, तर दुसऱ्या पॅनलमध्ये माजी मंत्री मधुकर पिचड आहेत मात्र आम्ही आमच्या सभासद व कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता मधुकरराव पिचड हे गायकरापेक्षा सक्षमपणे कारखाना चालवू शकतात याची खात्री आम्हाला असल्यामुळे आम्ही शेतकरी विकास मंडळाला पाठिंबा देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बाजीराव दराडे यांनी सांगितले की, अगस्ती कारखाना माजी मंत्री पिचड हेच समर्थपणे चालवू शकतात. टोळीच्या हातात सत्ता गेल्यास कारखाना बंद पडेल. त्यामुळे आम्ही पिचड साहेबांच्या सोबत जात आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.