Mangalvedha, 19 October : भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थक नेत्यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्यासह परिचारक समर्थक संचालकांबरोबरच मंगळवेढ्यातील समविचारी आघाडीचे नेतेही या शिष्टमंडळात होते.
यातील समविचारी नेत्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक किंवा भगीरथ भालके या दौघांपकी कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर पवारांनी दोन दिवसांत सर्व्हे करून पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पंढरपूर-मंगळवेढ्याचा (Pandharpur-Mangalvedha) उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता मतदारसंघात लागून राहिली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. पण, पवारांकडून अजूनही भालकेंना उमेदवारीचा सिग्नल मिळालेला नाही.
दुसरीकडे, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, यासाठी समर्थकांचा त्यांच्यावर दबाव वाढत आहे. तुतारीच्या चिन्हावर परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. बार्शीच्या दौऱ्यावर आल्यानंतरही परिचारक समर्थकांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील समविचारी आघाडीच्या शिष्टमंडळाने पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. त्या दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, अजित जगताप, युन्नस शेख, गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र पाटील, गौडप्पा बिराजदार, महादेव लुगडे, दिगंबर भाकरे, औदुंबर वाडदेकर, प्रवीण खवतोडे, विजय बुरकुल आदी उपस्थित होते.
शरद पवारांनी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्याकडून गतवर्षी दामाजीचे गाळप किती टन झाले, उसाला दर काय दिला, दामाजीचा साखर उतारा व साखर पोती किती उत्पादित झाली, याबाबत माहिती घेतली. अडचणीच्या काळात दामाजी कारखाना चांगला चालवल्याबद्दलही पवारांनी कौतुक केले. दामाजी कारखाना सुरू करण्यासाठी आपण (स्व.) कि. रा. मर्दा, (स्व.) रतनचंद शहा आणि (स्व.) चरणूकाका पाटील यांच्या माध्यमातून सहकार्य केल्याची आठवण त्यांनी या वेळी सांगितली.
समविचारी आघाडीतील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लवकर निश्चित करावा. माजी आमदार प्रशांत परिचारक किंवा भगीरथ भालके या दोघांपैकी कुणालाही संधी द्यावी पण त्याबाबतचा निर्णय लवकर जाहीर करावा, अशी मागणी केली. त्यावर शरद पवारांनी पंढरपूर मतदारसंघात पक्षांतर्गत सर्व्हे सुरू आहे. त्या सर्व्हेतून ज्या नावाची पसंती येईल, त्यानंतर दोन दिवसांत पंढरपूरचा उमेदवार निश्चित करण्यात येईल, असे यावेळी दिले सध्या पवारांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी जवळपास डझनभर इच्छुकांनी इच्छा व्यक्त केली आहे. भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, भगीरथ भालके यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. याशिवाय प्रशांत परिचारक यांनी तुतारीची उमेदवारी घ्यावी, अशी आग्रही मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. अशा परिस्थितीत या तिघांपैकी कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता मतदारसंघात शिगेला पोचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.