

Solapur, 29 May : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोलापूर विधान परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, रोहन देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, पक्षासाठी दोन वेळा माघार घेणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना रक्ताने पत्र लिहून साकडे घातले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती, बहुतांश नगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे सोलापूरची जागा भाजपच्या ताब्यात जाणार, हे निश्चित आहे. मात्र, उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा भारतीय जतना पक्षात दिसून येत आहे. उद्या उमेदवारीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक जून ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे महायुतीचे उद्यापर्यंत जागा वाटप होऊन उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजी पवार यांची नार्वे चर्चेत आहेत. मात्र तिकिटासाठी खरी रस्सीखेच परिचारक आणि राऊत यांच्यात दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीतू माघार घेतली आहे. मागील २०२४ च्या निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपुरात येऊन परिचारक यांची मनधरणी केली होती. त्यावेळी बावनकुळे यांनी परिचारक हे विधीमंडळात दिसतील, असे म्हटले होते. त्यामुळे परिचारकांचे पारडे जड मानले जात आहे.
दरम्यान, परिचारक समर्थकांनी पवित्र अधिक मासातील ‘कमाला एकादशी’च्या निमित्ताने चंद्रभागेच्या वाळवंटात श्री विठ्ठल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक यांच्या प्रतिमेस जलाभिषेक व दुग्धाभिषेक करून परिचारक यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी, असे साकडे घातले आहे. तसेच, या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गोरे यांना पत्र लिहून परिचारक यांना उमेदवारीची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.