Khatav News : उरमोडी कालव्यातून खटाव तालुक्यात पाणी सोडावे या मागणीसाठी आज तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या येथील कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
खटाव तालुक्यात Khatav News पावसाने ओढ दिल्याने बहुतांशी भागांतील शेती अडचणीत आली आहे. काही ठिकाणी शेती पिके पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजत आहेत. डिसेंबरमध्ये होणारे उरमोडीचे आवर्तन एक महिना उलटला तरी पाणी आले नाही. शिवाय कधी सुटेल याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरूनही खटाव तालुक्यात पाणी सुटले नाही. येत्या दोन दिवसात उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने Swabhimani shetkri sanghatna करण्यात आली होती.
याबाबत उरमोडी उपसा सिंचन विभागाला संघटनेच्यावतीने निवेदनही देण्यात आले होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, खटाव माण संपर्क प्रमुख शरदशेठ खाडे, वैभव पाटील व कार्यकर्ते व शेतकरी येथील उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात दाखल झाले.
कार्यकर्त्यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची विनंती करून स्वत:ला कार्यालयात कोंडून घेतले. तसेच जोपर्यंत खटाव तालुक्यात उरमोडी कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासन घेत नाही, तोपर्यंत कार्यालयातून बाहेर न पडण्याचा पवित्रा घेतला. कोण म्हणतं देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत नाही, पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
स्वाभिमानीच्या या आंदोलनामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाची तारांबळ उडाली. कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दुपारी बारा वाजल्यापासून चार ते पाच वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी संतोष बागल, शहर प्रमुख महेश गोडसे, अजय पाटील, संतोष तुपे, रविंद्र पाटील, राजू फडतरे, सत्यवान मोहिते, गोरख काळे, दिलीप जाधव, संतोष रासकर, संतोष निकम, विजय देवकर, सागर शिंदे, राजू बागल, सदाशिव बागल, योगेश बागल, हिंदुराव बागल, शंकर बागल, प्रमोद कुदळे, आदीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पालकमंत्री देसाईंना घेराव घालणार...
आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत अधीक्षक अभियंता नाईक यांची उद्या (शुक्रवारी, ता. 12) बैठक ठरली आहे. या बैठकीत उरमोडीचे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन संघटनेला मिळाल्यानंतर राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र सकारात्मक निर्णय झाला नाही तर, पालकमंत्री देसाई यांना गनिमी काव्याने घेराव घातला जाईल, असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.