
राजेंद्र त्रिमुखे
Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या रूपाने उभी फूट पडल्यानंतर लागलीच शरद पवारांनी राज्याचा दौरा घोषित करत जाहीर सभा घेणार असल्याचा मोठा निर्णय घेतला. यात येवल्यातील पहिलीच सभा मोठ्या पवारांसाठी जबरदस्त झाली. आता दुसरी अशीच भव्य सभा घेत शरद पवार आपली ताकत मराठवाड्यातील बीड येथे 17 ऑगस्टला होणाऱ्या सभेतून दाखवणार आहेत. मात्र, नियोजित सभा होण्याआधीच आमदार रोहित पवार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेवरून सभेचा विषय चांगला गाजतोय.
"आरोग्यमंत्री सावंत हे बाकीच्या खात्याचे निर्णय का घेतात, आपल्या खात्याचं बघा, बाकीचं बघू नका. समाधान आहे की कोरोना काळात सावंत आरोग्य मंत्री नव्हते नाहीतर काय झाले असते कोणास ठाऊक??" अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली.
तानाजी सावंतही आता आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि सडेतोड पद्धतीने व्यक्त होत. रोहित पवारांवर तुटून पडल्याचे दिसून येत आहे."ती भाषा बारामतीच्या कोपऱ्यात.. आमच्याकडे चालणार नाही,असे म्हणत यापुढे जर अशी भाषा करायचा प्रयत्न केला तर 'ठोक्यास ठोक' उत्तर दिले जाईल असा सज्जड इशाराच आरोग्यमंत्री सावंत यांनी दिला आहे. "त्या घराण्यात जन्माला आला म्हणजे कुठल्याही आजोबा पणजोबाला वरती बोलण्याचा अधिकार आपल्याला काय परमेश्वराने दिलाय?" असा प्रश्न मंत्री सावंत यांनी उपस्थित केला आहे.
कदाचित जास्तच दुखावलेले सावंत यांनी या विषयात महायुतीत नुकतेच आलेले अजित पवार यांचा संदर्भ देत, तुमच्या पक्षातील कणखर नेता आमच्या पंतप्रधानावरती व महायुतीच्या कामावर खुश होऊन आमच्यात उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाला, असे सांगत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना चांगलेच धारेवर धरले आहे.आता अजित पवार तानाजी सावंत यांच्या या आशयपूर्ण प्रतिक्रियेवर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.