अनिल कदम
Sangli News : तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ दिवंगत आर. आर. पाटील यांचा आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटानेही तासगाव तालुक्यात 'एन्ट्री' केल्याचे स्पष्ट झाले. या गटाच्या राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद तासगाव तालुक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील यांना देण्यात आले आहे. बदलत्या राजकीय समीकरणामुळे विधानसभा निवडणूक निर्णायक ठरणार आहे. या वेळी अजित पवार गटाची भूमिका काय राहणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातील राजकारणही बदलत आहे. शरद पवार यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फारकत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांचा गट राज्याच्या विविध भागात पाय पसरत आहे. सांगली जिल्ह्यातही अजितदादा गटाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी चंग बांधला आहे. (Tasgaon-Kavathe Mahankal Assembly constituency)
शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील असले तरीही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजितदादा गटाकडून केला जात आहे. महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बांधणी झाल्यानंतर अजितदादांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा आर.आर. आबा पाटील आणि कुटुंबीयांचा बालेकिल्लाच राहिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आर. आर. आबांच्या निधनानंतर तालुक्यातील चित्र बदलले आहे. आबांच्या पश्चात काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. काहींनी अलीकडच्या काळात शिवबंधन बांधले. त्यातीलच वायफळे येथील साहेबराव पाटील यांनी देखील राष्ट्रवादीशी फारकत घेतली होती. स्थानिक पातळीवरील निवडणुकात साहेबराव पाटील यांची भूमिका राष्ट्रवादीसोबत जाण्याची राहिली होती. त्यांच्यामुळेच वायफळे येथील ग्रामपंचायतीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतदेखील साहेबराव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. पाटील यांनी नुकताच अजितदादा गटात प्रवेश केला आहे.
अजित पवार गटासोबत जाऊ नये, यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, आमदार सुमन पाटील यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना अपयश आले. साहेबराव पाटील यांनी पवार गटाची तालुक्यातील धुरा सांभाळत गट आणखी मजबूत करण्यासाठी वैभव पाटील यांच्या मदतीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यानिमित्ताने अजित पवार गटाची आबांच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री झाली असून, विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. आगामी निवडणूकीत काय होणार, याकडे तासगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विसापूर सर्कलमध्ये वैभव पाटलांचा गळ
तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 21 गावे खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये समाविष्ट आहेत. खानापूरचा आमदार ठरवण्यासाठी विसापूर सर्कल नेहमीच निर्णायक राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या वैभव पाटील यांनी जिल्हाभर गट सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यांच्याच मतदारसंघातील विसापूर सर्कलमध्ये अद्याप तगडा पदाधिकारी मिळाला नाही, या ठिकाणी भाजपमधील नाराजांना गळ टाकून पवार गटात सहभागी करून घेण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
(Edited By - Rajanand More)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.