Ahmadnagar Politics : महिला सरपंच शोभाताई घोगरेंच्या भाषणाने पालटवला विखेंचा 'गणेश' चा सारीपाट?

Radhakrishna Vikhe Patil News : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरला.
Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe News
Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Ganesh Sugar Factory Election) विखेंच्या पॅनलचा पराभव करत कोल्हे-थोरात गटाच्या पॅनलचा दणदणीत विजय मिळवला. निवडणूक संपली असली तरी या निवडणुकी दरम्यान, झालेला प्रचार, हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, हार-जित, भाषणबाजी यावरचे कवित्व अजून संपण्याचे नाव घेताना दिसत नसल्याचे एकूण चित्र आहे.

राज्याचे महसूल मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पॅनलचा पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागण्याबरोबरच राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर चर्चेचा विषय ठरली ती प्रचाराची राहत्यातील सांगता सभा. त्या सभेतील लोणी खुर्दच्या सरपंच आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधक शोभाताई घोगरे यांचे तडफदार मार्मिक भाषण हे प्रचंड व्हायरल झालेले. त्यांनी आपल्या भाषणात विखे परिवाराचा खरपूस समाचार घेतल्याचे दिसून येत आहे.

Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe News
World Cup 2023 : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची रोहित पवारांनी काढली समजूत ; आपणही जरुर या..

लोणी खुर्दच्या लोकनियुक्त सरपंच शोभाताई घोगरे यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी ज्या पद्धतीने विखे परिवारावर मिश्किल, बोचरी आणि मुद्देसूद टीका केली. एकूणच निवडणुकीचा नूरच त्यांच्या भाषणाने पालटवला असे बोलले जातेय. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना टार्गेट केल्याचे दिसून आले. त्याच बरोबर एकूणच प्रवरा परिसरात झालेला विकास हा नेमका एकट्या विखेंचाच की यामध्ये इतरांचाही सहभाग होता याबद्दलही त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

आपल्या भाषणात घोगरे यांनी ग्रामीण भागातील उदाहरण देताना सांगितलं की आपण साधे घर घेताना किंवा शेत घेताना अगोदर विचारतो की शेजारी कसा आहे, त्यामुळे मला विचारा की आमचा शेजारी कसा आहे, असे म्हणत त्यांनी विखेंवर तोफ डागली. यानंतर सभेत एकच हशा पिकला. घोगरे म्हणाल्या की विखेंनी पन्नास वर्षे सत्ता परिसरात उपभोगली. गावच्या सरपंच पदापासून, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद असे सर्वकाही यांना आपल्याच घरात हवे असते. गावातील साध्या टपरीचा उद्घाटनही त्यांच्या हातानेच, सर्वांच्या लग्नपत्रिकेतही त्यांचेच नाव हवे असते. विखे म्हणजे सर्वांचे सोयरे अशी एकंदरीत परिस्थिती आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

निळवंडे धरणाच्या बाबतीत बोलताना घोगरे म्हणाल्या, कालव्यातून पाणी येताच प्रवरा परिसरात डीजेचा दणदणाट सुरू झाला. यात दादा (खा. सुजय विखे) आघाडीवर होते. निळवंडेची पायाभरणी झाली त्यावेळी दादाचा जन्मही झाला होता की नव्हता हे माहीत नाही, पण त्यांचे कार्यकर्ते डीजेचा दणदणाट लावून दादांच्या पुढे पुढे करताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.

Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe News
Co-operative Societies Election : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

गणेश कारखाना त्यांनी चालवला पण येथील शेतकऱ्यांना उसाचा भाव त्यांनी चांगला दिला का असा प्रश्न घोगरे यांनी उपस्थित करत संगमनेर, संजीवनी, अंबालिका सारखा ते भाव देऊ शकले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याच प्रवरा कारखान्याला सध्या घरघर लागलेली आहे. मात्र, असे असताना त्यांची नजर एकीकडे गणेशवर तर दुसरी राहुरीवर असते असे घोगरे म्हणाल्या होत्या.

गणेश कारखान्याची अडचण पाहून विखेंना तुम्ही घरात घेतले या निमित्ताने घोगरे यांनी उंटाच्या पिल्लाचे उदाहरण देताना सांगितलं की, उंटाच पिल्लू घरात घेतले की ते किती गोंडस दिसते म्हणून आपण त्याला जवळ करतो. गुणगान करतो पण हेच उंटाचे पिल्लू नंतर मात्र घराच्या बाहेर निघत नाही. निघाले तर ते घर फोडूनच निघते असे उदाहरण देत सभेमध्ये खसखस पिकवली.

Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe News
Rahul Gandhi Manipur Tour : राहुल गांधींचा ताफा मणिपूरमध्ये पोलिसांनी रोखला; आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड, गांधी इंफाळकडे रवाना

सांगोल्याला मी आमच्या नातेवाईकाकडे गेले असताना त्या ठिकाणी तेथील आमदार शहाजी बापू पाटील भेटले. त्यांनी विचारलं "पाहून कुठले तुम्ही" आम्ही सांगितले, की आम्ही प्रवरचे. त्यावेळेस त्यांनी, "अरे बापरे!! तुमच्याच घबाडामुळे आम्ही 40 जण ओके झालो" अशी प्रतिक्रिया दिली. एकूणच घोगरे यांनी शहाजी बापू पाटलांच्या प्रतिक्रियेचा हवाला देत गेल्यावर्षी जून महिन्यात झालेल्या सत्ता पालटात विखेंची नेमकी काय "भूमिका" होती हे सांगण्याचा प्रयत्न केला.

लोणी प्रवराचा विकास हा लोणी खुर्दच्या शिवारात झाल्याचे सांगत, यासाठी धनंजय गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान घोगरे, पीबी कडू पाटील, लामखेडे मामा आदींचा मोठा सहभाग होता. मात्र, विखेंनी असा इतिहास बदलला की सर्वकाही आम्हीच केले असे सांगितले जाते. आज आम्हाला घोगरे परिवाराला त्यांनी प्रवरा कारखान्यात सभासद होऊ दिलेले नाही. जो प्रवरा मेडिकल ट्रस्ट अनेकांच्या सहकार्याने उभा राहिला त्या ठिकाणी आम्हालाच आज लाईनीत उभा राहून केस पेपर काढावा लागतोय, अशी टिप्पणी शोभाताई घोगरे यांनी यावेळी केली होती.

Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe News
Vidarbha News : उद्योग सहसंचालकांकडून सरकारची फसवणूक, फडणवीसांनी एसआयटी गठित करावी !

अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो, असे सांगत घोगरे यांनी सांगत या परिसरातील हुकूमशाही, दडपशाही, हिटलरशाही सुरू आहे. असा आरोप करतानाच विखेंकडून एकीकडे काकडी विमानतळाचा हवाला देत सहा हजार बेरोजगारांना रोजगार ,500 एकर शेतीचा विकास, आयटी पार्क आदींच्या बाता मारल्या जातात.

मात्र, आमच्या गणेश कारखान्याच्या शेतकऱ्याला ऊसाला काय भाव याबद्दल ते बोलत नाहीत, असा आरोप केला. अगोदर आम्हाला तुम्ही संगमनेर संजीवनी यांच्यासारखा अधिकचा भाव द्या आणि मग मोठ्या गप्पा करा. तुम्ही स्वतःला राज्याचे नेते म्हणवता, तुम्ही महसूल मंत्री आहात मात्र दुसरीकडे तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे वेगवेगळ्या चौकशी कारवाया करतात, असा आरोप आपल्या भाषणात त्यावेळी शोभाताई घोगरे यांनी केला होता.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.