साडेसात किलो सोने चोरी : साताऱ्यातील सराफ पेठच केरळ पोलिसांच्या रडारवर

बहुतांशी सोने सातारा जिल्ह्यातील सराफांकडे वितळविल्याचे समोर आले आहे
Gold robbery kerla
Gold robbery kerlaSarkarnama
Published on
Updated on

सातारा : केरळ राज्यातील पलक्कड येथील 'मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी'तून लुटलेले सर्वच्या सर्व साडेसात किलो सोने सातारा शहरातील सदाशिव पेठेत असणाऱ्या भुसे गल्लीतील 'ज्योर्तिलिंग बुलियन रिफायनरी अँड गोल्ड टेस्टींग'मध्ये (जेबीएल) वितळविले असल्याचे केरळ पोलिसांनी काल उघडकीस आणले. याच 'गोल्ड टेस्टींग मशिन'वर 'मारूथा सोसायटी' दरोड्यातील सोने टेस्टींग करून ते साताऱ्यातील सराफांना वितरित केले आहे. केरळ पोलिसांची टीम आणखी काही दिवस सातारा येथे थांबणार असून त्यांच्या रडारवर आता संपूर्ण सातारा शहरातील सराफ पेठच आली आहे.

केरळ राज्यातील पलक्कड येथील 'मारूथा सोसायटी'वर दरोडा टाकून तीन कोटीहून अधिक रुपयांचे साडेसात किलो सोने लुटल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी संशयित म्हणून परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखिल जोशी याला अटक केल्यानंतर सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली. त्याला अटक केल्यानंतर पोलिस तपासांत त्याने हा दरोडा टाकल्याचा गुन्हा केला असल्याची माहिती केरळ पोलिसांकडून यापूर्वीच दिली आहे. दरम्यान, यापैकी त्याने बहुतांशी सोने सातारा जिल्ह्यातील सराफांकडे वितळविल्याचे समोर आले.

Gold robbery kerla
तीन कोटींची सोनेचोरी : केरळ पोलिसांची साताऱ्यात कारवाई

याचवेळी निखिल जोशी याला पंचमुखी परिसरातील आर. जी. ज्वेलर्सचा मालक राहूल घाडगे आणि सातारा येथील डॉ. निलेश साबळे याने सहकार्य केले असल्याची माहिती केरळ पोलिसांना लागल्यानंतर त्याचा शोध सुरु केला होता. दरम्यान, हा शोध सुरु असतानाच दुसरीकडे या दोघांकडून ज्यांनी चोरीचे सोने घेतले होते, त्यापैकी अडीच किलो सोने केरळ पोलिसांना काही सराफांनी स्वत:हूनच आणून दिले होते. त्यानंतर केरळ पोलिस साताऱ्यातून निघून गेले होते. मात्र, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात संशयित राहूल घाडगे स्वत:हून केरळ पोलिसांसमोर शरण आला होता. याचवेळी त्यांने जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो फेटाळण्यात आल्यानंतर त्याला पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले होते.

यावेळी केरळ पोलिस त्यांच्याकडून कसून तपास करत असतानाच त्याने या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे, सोने कोणत्या रिफायनरीत वितळविले तसेच डॉ. निलेश साबळे कुठे आहे, त्याच्या गाड्या कुठे लावल्या आहेत, याची सर्व माहिती दिली होती. त्यामुळे केरळ पोलिस पुन्हा साताऱ्यात आले होते. जवळपास वीसहून अधिक पोलिसांची टीम 'मारूथा सोसायटी' दरोडाप्रकरणाची नव्याने चौकशी करत आहेत.

'मारूथा सोसायटी' गोल्ड रॉबरी प्रकरणाच्या तपासात केरळ पोलिसांनी आता मोठी मजल मारली आहे. याप्रकरणातील संशयित डॉ. निलेश साबळे याची आणखी एक चारचाकी रविवारी दुपारी केरळ पोलिसांनी जप्त केली आहे. निलेशच्या दोन्ही चारचाकी केरळ पोलिसांनी जप्त केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्र हादरुन गेले आहे. त्यातच या प्रकरणात साताऱ्यातील अनेक सराफांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण सराफ पेठेतच खळबळ माजली आहे.

दरम्यान, सातारा येथील भुसे गल्लीतील जेबीएल फर्म सुजित जगताप याच्या मालकीची असून त्याचीही झडती केरळ पोलिसांनी घेतली. येथेच साडेसात किलो सोने वितळविण्यात आले आहे. ज्यावेळी झडती सुरु होती, त्यावेळी सुजित जगताप तेथे उपस्थित नव्हता. पोलिसांनी येथून 'गोल्ड टेस्टींग मशिन' सील करुन ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांना सुजित जगताप याचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, याच 'गोल्ड टेस्टींग मशिन'वर 'मारूथा सोसायटी' दरोड्यातील सोने टेस्टींग केले असून त्यानंतर ते साताऱ्यातील सराफांना वितरित केले आहे. केरळ पोलिसांची टीम आणखी काही दिवस साताऱ्यात थांबणार असून त्यांच्या रडारवर आता संपूर्ण सातारा शहरातील सराफ पेठच आली आहे. त्यामुळे अनेक सराफांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com