
Mohol, 22 June : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (डीसीसी बँक) ज्यांनी बुडविली, त्यांनी आता त्यांच्या मुलांना संधी देण्याचा घाट घातला आहे, हे मी चालू देणार नाही. अनेक सहकारी सोसायट्या आणि त्यातील कर्मचारी हे नेत्यांच्या गुलामगिरीमध्ये आहेत, त्यात पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी लगावला.
जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मोहोळमध्ये आल्यानंतर उमेश पाटील (Umesh Patil) यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आगामी वाटचालीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काम करताना सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. पक्षात ज्यांचे काम चांगले आहे, त्यांचा पुन्हा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्याचा उत्साह टिकवून ठेवणे, हे जिल्हाध्यक्ष म्हणून माझे काम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) नूतन कार्यकारिणी लवकरच निवडण्यात येईल, त्यात चांगले काम करणाऱ्या जुन्या पदधिाऱ्यांना संधी मिळू शकते, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सत्तेची हवा आणि मस्ती डोक्यात असणाऱ्या व्यक्ती बाजूला सारून काम करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली जाईल. सर्वसामान्यांना दंड थोपटणारे लोक आवडत नाहीत, त्यामुळे वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली, तर मी मागे पुढे पाहणार नाही, असा इशाराही उमेश पाटील यांनी दिला.
येत्या काही दिवसांत पालकमंत्री जयकुमार गोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष यांची भेटी घेणार आहे. युवक आणि युवतींचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाढला पाहिजे. अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, त्यामुळे निधीची कमतरता आपल्याला भासणार नाही, असा दावाही पाटील यांनी केला.
भीमा कारखाना मल्टीस्टेट करण्यास विरेाध
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ नये म्हणून आम्ही खासदार धनंजय महाडिक यांना मदत केली होती. त्याच एकमेव कारणामुळै आम्ही त्यांच्यासोबत होतो. मात्र, महाडिक यांनी भीमा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही भीमा कारखाना मल्टीस्टेट होऊ देणार नाही. आम्ही कायम सभासदांच्या सोबत आहोत, त्याला आमचा विरोध राहील, अशी रोखठोक भूमिकाही उमेश पाटील यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.