

Karad, 29 January : सातारा जिल्हा परिषद आणि कऱ्हाड पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अपक्ष व पक्षांकडून इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांना घाम फोडला. दरम्यान, नेत्यांनीही संबंधित इच्छुकांची मनधरणी करत, त्यांना आश्वासने देत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. कऱ्हाड दक्षिणेत अपवाद वगळता भाजपविरोधात राष्ट्रवादी अशी दुरंगी, तर कऱ्हाड उत्तरेत भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे.
सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या १२ आणि कऱ्हाड पंचायत समितीच्या २४ जागांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांकडून इच्छुक असणाऱ्यांची आणि अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यामुळे बंडखोरीमुळे होणारी मतविभागणी टाळण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागली.
शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादीचे (NCP) नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांना बंड होऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी त्यांना थोपविण्यासाठी थेट इच्छुकांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करावी लागली. काहींना आश्वासनेही द्यावी लागली. कऱ्हाड उत्तरेत आमदार मनोज घोरपडे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही काही अपक्षांना थोपविले. दोन दिवसांतील अर्ज माघारीच्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
अर्ज माघारीसाठी अपक्ष आणि इच्छुकांना आणण्यासाठी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या विश्वासूंवर जबाबदारी दिली होती. त्यामुळे दुपारी बारापासून तीनपूर्वी उमेदवारांना अर्ज माघारीसाठी आणण्यात संबंधित व्यस्त असल्याचे दिसत होते. काही उमेदवार दुपारी दोनपर्यंत नॉट रिचेबल असल्याने त्यांनीही नेत्यांचे टेन्शन वाढवले. मात्र त्यांनाही दुपारी तीनच्या आत अर्ज माघारीसाठी आणण्यात यश आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मसूर गट खुल्या प्रवर्गासाठी असल्याने तेथे मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप समर्थक असलेले कुलदीप क्षीरसागर, प्रमोद गायकवाड हे उमेदवारी अर्ज काढून घेतील, अशी शक्यता होती. मात्र, त्यांनीही उमेदवारी अर्ज ठेवल्याने तेथे बहुरंगी लढत होत असल्याने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतविभागणीला सामोरे जावे लागेल.
कोपर्डे हवेली गटातही भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यांनीही पत्नीचा अपक्ष अर्ज ठेवल्याने तेथे तिरंगी लढत होत आहे. तांबवे गटातून शिवसेनेचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप पाटील, भाजप समर्थक शंकर पाटील, विठोबा पाटील, विजय चव्हाण, विनोद पाटील, तात्यासो बाबर, काँग्रेसचे सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे स्वप्नील पवार, शिवसेनेचे तानाजी पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी लढत होत आहे.
सैदापूर गटातील एक उमेदवार दुपारपर्यंत फोन बंद करून होता. त्यामुळे त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या समर्थकांची धावपळ झाली. शेवटी अडीचच्या सुमारास तो उमेदवार आल्याने त्यांना दिलासा मिळाला. सुपे गणातून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतलेले गणेश पवार यांनीही पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
शिवदास यांना न्यायालयाचा दिलासा
सैदापूर गटातील भाजपचे उमेदवार सागर शिवदास यांच्यावर तीन अपत्य असल्याची हरकत जानराव यांनी घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. मात्र, त्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. न्यायालयाने दुसऱ्या दिवशी त्यांना दिलासा दिल्याने सैदापूर गटासाठीची शिवदास यांची उमेदवारी कायम झाली आहे.
सवादे गणातील उमेदवार उच्च न्यायालयात
कऱ्हाड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटांतर्गत असलेल्या सवादे पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार संजय बाबूराव शेवाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन बाळासाहेब थोरात यांनी शेवाळे यांचे नाव सवादे येथील मतदार यादीत, मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत आहे. त्यामुळे ते दुबार मतदार ठरतात आणि त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील हरकतींवर निर्णय देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असे सांगत शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. या निर्णयाविरोधात नितीन थोरात यांनी दुबार मतदाराचा मुद्दा उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल केले आहे, त्यामुळे त्याबाबत न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहा गटांत चुरशीच्या लढती
काले, वारुंजी, रेठरे बुद्रुक, तांबवे, कोपर्डे हवेली, मसूर विंग, कार्वे, येळगाव हे गट राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्या गटांत यावेळी चुरशीने लढती होतील. तेथे एकास एक तुल्यबळ उमेदवार असल्याने तेथील लढती चर्चेच्या ठरणार आहेत. त्यामुळे त्या लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
पालकमंत्री शंभूराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर यांची तांबवे जिल्हा परिषद गटात, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड दक्षिणेतील सैदापूर, काले, वारुंजी, रेठरे बुद्रुक, विंग, कार्वे, येळगाव या गटांत, तर आमदार मनोज घोरपडे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची पाल, मसूर, कोपर्डे हवेली, उंब्रज या कऱ्हाड उत्तरमधील गटांत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.