
जुन्नरमध्ये माजी जि.प. अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवस शोभायात्रेत मोठा अपघात झाला.
डीजे वाहनाच्या धडकेत ढोल-ताशा पथकातील २१ वर्षीय आदित्य सुरेश काळे याचा मृत्यू झाला.
या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनेची पुष्टी केली असून चौकशी सुरू आहे.
Pune News : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डीजे वाहनाच्या अपघातात ढोल-ताशा पथकातील आदित्य सुरेश काळे (वय 21) या तरुणाचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली. याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
नेमकी काय होती घटना...
देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी होते. खामगावजवळील शिवेचीवाडी येथील आदिवासी ठाकर समाजाच्या मुक्तादेवी तरुण मंडळाचे ढोल-ताशा पथकही यात सामील होते.
शोभायात्रा जुन्नर बाजार समितीतून धान्य बाजाराकडे जात असताना उतारावर डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील तरुणांवर धडकले. वाद्यांच्या आवाजामुळे वाहन येत असल्याचे काहींना लक्षात आले नाही. यात आदित्य सुरेश काळे याला वाहनाने फरफटत नेले, तर गोविंद काळे, विजय केदारी, सागर केदारी, बाळू काळे आणि किशोर घोगरे हे जखमी झाले. वाहन बाजार समितीच्या प्रवेशद्वारातील चौकीदाराच्या खोलीवर जाऊन आदळले.
आदित्य हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. तो त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील सुरेश काळे हे खामगावचे माजी उपसरपंच असून, त्याची आई-वडील मोलमजुरी करतात. आदित्यच्या मृत्यूनंतर संतप्त आदिवासी ठाकर समाजबांधवांनी जुन्नर पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन करत आयोजक आणि डीजे वाहनचालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, वाहनाचे ब्रेक निकामी झाले किंवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले याबाबत तपास सुरू आहे. शोभायात्रेत बंदी असलेल्या डीजे वाहनाचा समावेश का करण्यात आला? शोभायात्रा आणि वाद्य वाजवण्यासाठी पोलिस परवानगी घेतली होती का? डीजे वाहनाचा परिवहन विभागाचा परवाना आणि वाहनाची रस्त्यावरील योग्यता तपासली गेली होती का? या प्रश्नांची चौकशी होत आहे. तसेच, जुन्या वाहनांत बदल करून डीजे वाहन तयार केले जाते, याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करते, असा आरोप होत आहे.
प्र.1: अपघात कुठे घडला?
उ.1: जुन्नरमध्ये माजी जि.प. अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवस शोभायात्रेत अपघात झाला.
प्र.2: या अपघातात कोणाचा मृत्यू झाला?
उ.2: ढोल-ताशा पथकातील आदित्य सुरेश काळे (वय २१) या तरुणाचा मृत्यू झाला.
प्र.3: किती लोक जखमी झाले?
उ.3: या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
प्र.4: गुन्हा कोणावर दाखल झाला आहे?
उ.4: आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
प्र.5: पोलिसांनी काय माहिती दिली?
उ.5: पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनेची पुष्टी केली असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.