Kolhapur Politics : आजी-माजी जिल्हाध्यक्षांचा पक्षांला ठेंगा; उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी निश्चित

kolhapur Vidhan Sabha Politics : उमेदवारी न मिळण्याचे संकेत ही अनेकांना मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील आजी-माजी जिल्हाध्यक्षांच्या तोंडी बंडखोरीची भाषा सहजपणे येऊ लागली आहे.
Kolhapur Vidhan Sabha
Kolhapur Vidhan Sabha Sarkarnama
Published on
Updated on

गेल्या अनेक वर्ष राजकारणात तग धरून असलेले आणि मतदारांचे उंबरे झिजवलेले राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना आता आमदारकी हवी आहे. राज्यातील सत्ता बदलामुळे अनेकांची राजकीय इच्छाशक्ती वाढल्याने आमदारकीसाठी मनोबल वाढले आहे. अशातच पक्षाने पात्रता, निकषाच्या मुद्द्यांच्या आधारावर विद्यमान आमदारांनाच संधी देणार असल्याची माहिती आहे. विरोधकांना लोकसभा निवडणुकीतील यश डोळ्यासमोर दिसत असल्याने अनेकांची राजकीय इच्छाशक्ती जागृत झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आजी-माजी जिल्हाध्यक्ष आता आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र उमेदवारी न मिळण्याचे संकेत ही अनेकांना मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील आजी-माजी जिल्हाध्यक्षांच्या तोंडी बंडखोरीची भाषा सहजपणे येऊ लागली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भाजपमधील दोन जिल्हाध्यक्ष सध्या बंडखोरी करणाऱ्या वर ठाम आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते आणि माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीकडून मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर घाटगे हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. ते अपक्ष किंवा तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली आहे. स्थानिक राजकारणात आमदार प्रकाश अबिटकर विरुद्ध देसाई असा संघर्ष पाहायला मिळतो. त्यामुळे राधानगरीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद ग्रामपंचायत आणि बिद्री कारखान्याच्या निमित्ताने बाहेर आला आहे.

Kolhapur Vidhan Sabha
Uddhav Thackeray CM : मुख्यमंत्रिपदावरून दानवेंचे काँग्रेसला चॅलेंज; ठाकरेंना विरोध असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान

राष्ट्रवादीतील तीन आजीमाजी जिल्हाध्यक्ष सध्या बंडखोरीवर ठाम आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष के पी पाटील हे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महायुती एकत्र लढल्यास आमदार आबिटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यामुळे के पी पाटील (K P Patil) हे राष्ट्रवादीलाच रामराम करण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्या पाठोपाठ माजी जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेपूर्वीच त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत आपली बंडखोरी दाखवून दिली आहे.

Kolhapur Vidhan Sabha
Uddhav Thackeray CM : मुख्यमंत्रिपदावरून दानवेंचे काँग्रेसला चॅलेंज; ठाकरेंना विरोध असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP) जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील हे निवडणूक लढवण्यास तयार आहेत. मात्र या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. लोकसभेची जागा राष्ट्रवादीने सोडल्यानंतर विधानसभेत कोल्हापूर उत्तरची जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांनी पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्यास त्यांनीही बंडखोरी करण्याची तयारी ठेवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्याचे भाजपचे सहयोगी सदस्य असलेले आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी बंडखोरी करत आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे सर्वच आजी-माजी जिल्हाध्यक्ष पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून आमदारकी मिळवण्याच्या तयारीत आहेत. गेली अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना केवळ दुसऱ्यांना आमदार बनवण्यासाठी धडपड केली. मात्र आपल्या पदरात काय पडले? अशी भावना आजी माजी जिल्हाध्यक्षांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे या चार विधानसभा मतदारसंघात बंडखोरी अटळ असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com