

Solapur, 13 April (विठ्ठल सुतार) : सोलापूर,माढा लोकसभा मतदारसंघासोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी धाराशिव शिवसेनेच्या कामाचा आढावा घेतला. पक्षश्रेष्ठींसमोरच धाराशिव शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन पहिल्या सेकंदात झाले. जिल्हाप्रमुख अजित पिंगळे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा गट एकमेकांना भिडला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच भाजपला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला. खासदार शिंदे यांनी मध्यस्थी करत आता काय मारामारी करायचीय? खाली बसा, असे सांगत पदाधिकारी-कार्यकर्त्यांना शांत करत या वादाची पक्ष योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. जिल्हाप्रमुख अजित पिंगळे आणि काही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. कळंबमध्येही पिंगळे गट आणि आमदार तानाजी सावंत गटही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्याचे प्रतिबिंब सोलापूरमध्ये झालेल्या श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही उमटले.
धाराशिव शिवसेना पदाधिकाऱ्यांचे दोन गट दोन ठिकाणी बसलेले होते. जिल्हा परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून दोन्ही गट आक्रमक होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप करत युतीमध्ये धाराशिव, तुळजापूर व कळंब या तालुक्यातील २९ पैकी ५ जागा घेतल्या, त्यापैकी ३ जागेवर भाजपच्या लोकांना संधी दिली. अशीच परिस्थिती नगरपालिका निवडणुकीत होती. सर्व पदाधिकाऱ्यांचा रोख हा अजित पिंगळे यांच्यावर होता.
कळंब पंचायत समितीचे सभापती, पंचायत समितीचे तीन सदस्य तसेच जिल्हा परिषदेचेही दोन सदस्य विजयी झाले आहेत. हे सर्व जिल्हाप्रमुख पिंंगळे गटाचे समर्थक मानले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी काही नेत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळेही शिवसेनेत तणाव वाढला आहे.
धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या चार जाग लढवून तीन जागा जिंकल्या आहेत. तसेच, कळंबमध्ये केवळ तीन पंचायत समिती सदस्य असूनही शिवसेनेचा सभापती करण्यात जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना यश आले आहे, त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे, असे तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते यांनी सांगितले.
शिवसेनेची ताकद कमी असल्याचे सांगून त्या जागेवरून भाजपचे उमेदवार निवडून आणले जातात, असे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख भारती गायकवाड यांनी सांगितले. मी चार वर्षांपासून शिवसेनेत काम करतोय, पण मला भाजपचा म्हणून आपलेच लोक सांगतात. जिल्हा परिषदेला मी तालुक्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलो आहे. पण काही जण १०-१० वर्षे सदस्य असूनही त्यांच्या सर्कलमध्ये विधानसभेला कमी मते पडतात. पण त्यांना जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीत मतं कशी मिळतात? असा सवाल अनंत लगडे यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप मडके यांनीही आपली खंत बोलून दाखवली. मोहा मतदारसंघाचे माजी दोन टर्म नेतृत्व केले आहे. माझी पत्नी सध्या सरपंच आहे, तर मी बाजार समितीचा संचालक आहे. असे असूनही झेडपीला माझी उमेदवारी कापण्यात आली आणि पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला, असेही मडके यांनी सांगितले.
भूम परांडा, वाशी या तीन तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या १३ जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या, त्यापैकी ८ जागा निवडून आल्या आहेत, तर दोन जागा निसटत्या मतांनी गमावावा लागल्या आहेत, असे सावंत गटाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.