कोल्हापूर : मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 'हिंदूह्रदयसम्राट' असा उल्लेख असणारे बॅनर्स मुंबईतील (Mumbai) घाटकोपर भागात झळकल्याने राजकीय वर्तुळामध्ये चांगल्याच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र नंतर या प्रकरणावरुन मनसेने पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारची बॅनरबाजी न करण्याचे आदेश दिले होते. यानंतर काहीच दिवसांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट' असे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक प्रचारात बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची आठवण काढत शिवसेनेवर टीका केली होती. ते म्हणाले होते, शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर ताराराणींचा पुतळा पाहिल्यानंतर मला नेहमीच अभिमान वाटतो. दरवेळी यायचो, तेव्हा शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. आज मात्र हिंदुत्त्वाचे नामोनिशाण येथे दिसत नाही, याचे वाईट वाटते. पण, भगव्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मैदानात आहे, असेही ते म्हणाले होते.
या दोन्ही घटनांवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते आज 'कोल्हापूर उत्तर' विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन प्रचारसभा घेतली. यात ते बोलत होते. उत्तर देताना ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस काल म्हणले, मी पूर्वी यायचो तेव्हा ताराराणी चौकात बाळासाहेब ठाकरेंचा एक फोटो असायचो. त्यावर लिहीलेले असायचे "तमाम हिंदु बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो". मग मी माझ्या भाषणाची सुरुवात काय केली? सतत सांगण्याची काय गरज नसते मी हिंदुहृदयसम्राट आहे.
देशात काही लोकांनी मधल्या काळात हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला पण तो लोकांनी झिडकारला. कारण हिंदुहृदयसम्राट म्हटल्यानंतर केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरेंचेच नाव येते. दुसरे कोणी येत नाही आणि असूच शकत नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना जो धावून जातो तो हिंदुहृदयसम्राट असतो. त्यावेळी तुम्ही घरी बसणार आणि नंतर प्रसारमाध्ममांसमोर येवून तुम्ही प्रतिक्रिया देणार, त्यामुळे तुम्ही केवळ प्रतिक्रिया सम्राट होवू शकता हिंदुहृदयसम्राट नाही. तुम्हाला जर हिंदुहृदयसम्राट यांच्याबद्दल इतकाच अभिमान असेल तर मध्यंतरी तुम्हीच त्यांच्या नावापुढे नीच ही पदवी लावण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायला विरोध का? समृद्धी महामार्गाला नाव द्यायाला विरोध का? असा सवाल देखील त्यांनी भाजपला विचारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.