वसंतदादांच्या वारसांचा विक्रमी मते घेत सांगली जिल्हा बॅंकेत प्रवेश!

सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जयश्री पाटील व विशाल पाटील यांचा विजय
Jayshree Patil-Vishal Patil
Jayshree Patil-Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sangli District Bank) निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने १८ जागांच्या लढतीत १४ जागा जिंकून बाजी मारली. बॅंकेच्या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या भाजपनेही चार जागा जिंकत ताकद दाखवून दिली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील दोघांनी विजय मिळवत बॅंकेत एन्ट्री मिळविली आहे. त्यात श्रीमती जयश्री पाटील यांनी सर्वाधिक १६८६ मते मिळवत विजय मिळवला, तर दुसरे विशाल पाटील यांनीही निवडणुकीत बाजी मारली. महाआघाडीने जिल्हा बॅंक राखली असली तरी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत (vikram sawant) यांचा पराभव धक्कादायक म्हणावा लागेल. (Victory of Jayshree Patil and Vishal Patil in Sangli District Bank election)

सांगली जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाल्यामुळे १८ जागांसाठी लढत होती. महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल विरूद्ध भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत झाली. सहकारचे १८ तर शेतकरी पॅनेलचे १६ उमेदवार आणि अपक्ष १२ उमेदवार रिंगणात होते.

Jayshree Patil-Vishal Patil
शिराळ्याच्या दोन भाऊंची जिल्हा बॅंकेत एन्ट्री

मिरजेतील बाजार समिती आवारातील शेतकरी भवनमध्ये आज सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ झाला. सोसायटी गटातील मतमोजणी प्रथम झाली. मिरजेचा पहिला निकाल जाहीर झाला. महाआघाडीचे उमेदवार तथा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजपच्या उमेश पाटील यांचा ५२-१६ मतांनी पराभव केला. त्यानंतर जल्लोष सुरू झाला. जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या जतमध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा पाच मतांनी पराभव झाल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतील नेते प्रकाश जमदाडे यांनी भाजपच्या पॅनेलमधून मिळवलेली उमेदवारी सार्थ ठरवली. त्यांनी आमदार सावंत यांचा ४५-४० असा पराभव केला.

Jayshree Patil-Vishal Patil
जयंत पाटलांना होमपिचवरच मोठा धक्का

आटपाडीत चुरसीच्या लढतीत महाआघाडीतील शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा ४०-२९ असा पराभव केला. या गटात आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशमुख यांच्या बाजूने ताकद लावली होती. तरीही आमदार अनिल बाबर यांनी ताकद पणाला लावत पाटील यांना विजयी करण्यात हातभार लावला. कवठेमहांकाळमध्ये महाआघाडीतील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विठ्ठल पाटील यांचा ५४-१४ असा एकतर्फी पराभव केला. तासगावमध्ये तिरंगी लढतीत महाआघाडीच्या बाळासो पाटील यांनी भाजपच्या सुनिल जाधव यांचा ४१-२३ असा पराभव केला. तसेच अपक्ष म्हणून लढणाऱ्या विद्यमान संचालक प्रताप पाटील यांचाही पराभव केला.

Jayshree Patil-Vishal Patil
विश्वजित कदमांच्या मावसभावाचा पराभव घडवत जगतापांनी मुलाच्या पराभवाचा हिशेब चुकता केला

वाळव्यातून विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांनी भाजपचे भानुदास मोटे यांचा १०८-२३ असा दणदणीत पराभव केला. कडेगावमधून विद्यमान संचालक आमदार मोहनराव कदम यांनी भाजपच्या तुकाराम शिंदे यांचा ५३-११ असा एकतर्फी पराभव केला.

महिला राखीव गटात कॉंग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील यांनी निवडणुकीत सर्वाधिक १६८६ मते मिळवली. गतवेळच्या निवडणुकीत दिवंगत नेते मदन पाटील यांचा दोन मतांनी पराभव झाला होता. जयश्रीवहिनींसाठी मदनभाऊ युवा मंचने ताकद लावून विजयश्री खेचून आणून ताकद दाखवली. या गटात त्यांच्याबरोबर महाआघाडीच्या अनिता सगरे या १४०८ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या पॅनेलमधून लढणाऱ्या माजी महापौर संगीता खोत यांना ६१६ व दिपाली पाटील यांना ४३९ मते मिळाली.

Jayshree Patil-Vishal Patil
आर.आर. पाटील गटाने पराभवाचा वचपा काढला; सांगली बॅंक निवडणुकीत तासगावमध्ये राष्ट्रवादी विजयी

अनुसूचित जाती गटात विद्यमान संचालक बाळासो होनमोरे यांनी भाजपचे रमेश साबळे यांचा एकतर्फी पराभव केला. ओबीसी गटात चुरसीची लढत होईल अशी अपेक्षा असताना महाआघाडीतील मन्सूर खतीब यांनी त्यांच्याच तालुक्यातील तम्मनगौडा रवि यांचा एकतर्फी पराभव केला. विमुक्त जातीमध्ये ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे यांनीही भाजपच्या परशुराम नागरगोजे यांचा एकतर्फी पराभव केला. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या वैभव शिंदे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवारच नसल्यामुळे त्यांची बँकेतील एंट्री यापूर्वीच निश्‍चित झाली होती. त्यावर निकालानंतर शिक्कामोर्तब झाले.

दिवंगत आर.आर. आबांचे बंधू विद्यमान संचालक सुरेश पाटील यांनी प्रक्रिया संस्था गटात विद्यमान संचालक भाजपचे सी.बी. पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पतसंस्था व बँका गटात काही ठिकाणी क्रॉस व्होटींग आणि पै-पाहुण्याचे राजकारण दिसून आले. या गटात महाआघाडीचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे राहुल महाडिक निवडून आले. तर महाआआघाडीचे किरण लाड व भाजपचे अजित चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. मजूर सोसायटी गटात प्रचाराच्या सुरवातीपासून आघाडीवर असलेले विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व सत्यजित देशमुख यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. या गटात महाआघाडीच्या हणमंतराव देशमुख व सुनिल ताटे यांचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com