Solapur, 20 October : भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील दोन देशमुखांसह जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी या तिघांचा समावेश आहे. भाजपने पुन्हा एकदा प्रस्थापितांना उमेदवारी देत भाकरी फिरवण्याचे टाळले आहे. सोलापुरातील मातब्बर असलेल्या दोन देशमुखांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना, तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोटमधून उमेदवारी देत देवेंद्र फडणवीस यांनी आपली जुनी टीम कायम ठेवली आहे.
सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दोन्ही देशमुखांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता, त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीच्या संदर्भात भाकरी फिरवली जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच आज जाहीर झालेल्या यादीत सोलापूर शहर उत्तर मतदासंघातून विजयकुमार देशमुख यांना, तर दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख हे सलग चार वेळा निवडून आले आहेत. ते आता पुन्हा पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी माजी महापौर, माजी सभागृह नेते यांच्यासह माजी नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. मात्र भाजपने सर्वांची समजूत घालत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे, सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनीही त्यांच्या विरोधात उठाव केला होता. त्यांना माजी उपमहापौर, माजी सभागृह नेते आणि सात माजी नगरसेवकांनी विरोध केला होता. पण, भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे, त्यामुळे सोलापुरातून दोन्ही देशमुख यांची उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजपने दाखवलेले नाही.
भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना पुन्हा संधी देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील लोकांना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकंदरितच भाजपने विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत नव्याचा विचार केलेला दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.