पुणे : अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेचे (Vishal Phate) शिक्षण बीएपर्यंतच झाले आहे. पण तो एमबीएचे शिक्षण घेतल्याचे सांगत असे. तसेच त्याचे इंग्रजी चांगले असल्याने लोक त्याच्या बोलण्याला भुलत होते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराच्या फोटोसह इतर इतर बड्या मंडळींसोबत्या फोटोचा त्याने फसवणुकीसाठी वापर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या फोटोंनीच अनेकांचा घात केल्याचे बोलले जात आहे.
फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादी राहिला नसून इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली असून फसवुणकीचा आकडा १८ ते १९ कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. विशाल फटे यांनी जादा परताव्याच्या अमिषाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमिशन एजंट नेमून पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे.
फटे याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी संपादन केले आहे. त्याला इंग्रजी बऱ्यापैकी बोलता येत होते. शेअर मार्केटची माहितीही त्याने जमवली होती. त्याच आधारे त्याने लोकांकडून पैसे जमवण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी काही प्रसिध्द लोकांसोबतचे फोटोही गुंतवणूक करणाऱ्यांना दाखवायचा. त्यातच त्याला मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते एका माध्यम समुहाचा पुरस्कार मिळाला होता.
या फोटोचाही त्याने गुंतवणूकदारांना विश्वासात घेण्यासाठी वापर केला. हे फोटो पाहून विशालवर विश्वास ठेवत अनेकांनी गुंतवणूक केली. पण त्याचे कारनामे समोर आल्यानंतर दहा दिवसांपूर्वी तो फरार झाला आहे. गोयल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतानाचा विशाल फटेचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. दिल्लीत एका आलिशान हॉटेलमध्ये मागील वर्षीच नोव्हेंबर महिन्यात हा कार्यक्रम झाला होता. एका माध्यम समूहाचा राईज स्टार्टअप टू युनिकॉर्न या पुरस्कार सोहळ्यात फटेचा गोयल यांनी सन्मान केला होता. पायोनिअरींग इम्पॅक्ट ऑन इंडियन इंडस्ट्री-अल्गो ट्रेडिंग असं फटेला मिळालेल्या पुरस्काराचे नाव आहे.
विशालका कन्सल्टंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक असं पद या पुरस्कारावर देण्यात आलं होतं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर कटोर परिश्रम व समर्पणाचे फळ मिळाल्याची भावना फटे याने व्यक्त केली होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शेकडो नागरिकांना गंडा घालून पसार झालेल्या विशाल फटे याने पोलिसांची मात्र झोप उडवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.