Wai NagarParishad Election : भाजपचं 'एक-एक' मत फिरवण्यासाठी मकरंदआबांची फिल्डिंग; शिवेंद्रराजेंनीही घातलंय लक्ष

Wai Palika Election : वाई नगरपालिकेत राष्ट्रवादी- भाजप यांच्या अटीतटीच्या लढतींसह अनेक प्रभागांत तिरंगी-चौरंगी लढत होत आहे. कोण बाजी मारणार पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Wai Municipal Election, NCP vs BJP, Makarand Patil, Shivendraraje Bhosle
Wai Municipal Election, NCP vs BJP, Makarand Patil, Shivendraraje BhosleSarkarnama
Published on
Updated on

Wai Palika Election : दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या वाई नगरीच्या नगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँगेस आणि भाजपने कंबर कसली आहे. राज्यात हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून सत्तेत असले तरी वाईमध्ये सध्या एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याशिवाय शिवसेनेचे 7 आणि महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीचे उमेदवारही रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 5 आणि राष्ट्रीय काँग्रेसने नगराध्यक्षांसह एका प्रभागात उमेदवार दिला आहे. त्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांकडून विजयासाठी गनिमीकावा आणि रणनीतीला वेग आला आहे. प्रत्येक उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून दारोदार जाऊन मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे.

नगरपालिकेच्या मागील सभागृहात थेट नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे अवघ्या एका मताने विराजमान झाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीचे 14 व भाजप, काँग्रेस, शिवसेना यांच्या वाई विकास आघाडीचे 6 असे नगरसेवक होते. त्यानंतर अवघ्या 9 ते 10 महिन्यात नगराध्यक्ष डॉ. शिंदे यांना लाचखोरीच्या आरोपात अटक झाली. 2021 मध्ये नगरविकास विभागाने त्यांचे निलंबन केले. आणि या पदाचा कार्यभार उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडे सोपविला. त्यामुळे या पाच वर्षांत सत्तारूढ व विरोधी या दोन्ही आघाड्यांना सत्तेची संधी मिळाली.

या काळात आणि नंतर प्रशासकीय काळात शहराच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला, तरीही नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि समस्या अद्याप सुटल्या नाहीत अशी तक्रार होत आहे. आता मकरंद पाटील यांना याच एका मताच्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. पण भाजप आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यापूर्वीच डाव साधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनिल सावंत यांना आयात करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने नवख्या नितीन कदम आणि काँग्रेसने प्रदीप मारूती जायगुडे यांना नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरविले आहे. अपक्ष दीपक जाधव हे मैदानात असले तरी मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी या दोनच पक्षात होणार आहे.

प्रत्‍येक प्रभागात काटे की टक्‍कर :

येथे होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात ‘काटे की टक्कर’ असून, निष्ठावंतांना डावलल्याने निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांना करावे लागणार आहे. प्रभाग एकमध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्ग महिला राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता हगीर यांच्यापुढे भाजपच्या अपर्णा जमदाडे यांचे आव्हान आहे, तर सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नायकवडी, भाजपचे (BJP) प्रसाद बनकर व शिवसेनेच्या माया चौधरी अशी चुरशीची तिरंगी लढत होत आहे. पक्षांतर, उमेदवारी वाटपातील गोंधळ, त्याच त्याच घरात उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील नाराजी यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Wai Municipal Election, NCP vs BJP, Makarand Patil, Shivendraraje Bhosle
Wai Politic's : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अरुणादेवी की नवीन चेहरा; गोरेंसमोर गळ्यात गळे घालणारे पिसाळ-ननावरे काय करणार?

धनवेंची उमेदवारी चर्चेची :

प्रभाग दोनमध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे घनश्याम चक्के व भाजपचे ज्ञानेश्वर सूर्यवंशी, तर सर्वसाधारण महिलांमधून भाजपच्या पद्मा जाधव व राष्ट्रवादीच्या सुप्रिया धनवे यांच्यामध्ये चुरस आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक महेंद्र धनवे यांच्या पत्नी सुप्रिया धनवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असून, त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम किती होतो यावर निकाल अवलंबून आहे.

सूनबाईंसाठी लढत :

प्रभाग तीनच्‍या अनुसूचित जाती राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप जावळे, भाजपचे प्रा. बिपिन वैराट, शिवसेनेचे सतीश वैराट व अपक्ष राकेश मोरे अशी तिरंगी लढत आहे. याठिकाणी सतीश वैराट व संदीप जावळे या माजी नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महिला राखीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. जीविता अतुल जमदाडे, भाजपच्या मीनाक्षी विजय जमदाडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शबाना गफूर मुजावर अशी तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी माजी नगराध्यक्ष डॉ. अमर जमदाडे यांच्या सूनबाई नशीब अजमावत असल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

चार, पाचमध्‍ये अटीतटीच्‍या लढती :

प्रभाग चारच्‍या अनुसूचित जाती महिला राखीवमध्ये राष्ट्रवादीच्या शारदा काळे, भाजपच्या छाया राजेंद्र सदाफुले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तृप्ती विकी सकटे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संग्राम पवार, भाजपचे केदार काटे, शिवसेनेचे कृष्णा भगत यांच्यातील तिरंगी लढत चुरशीची होणार आहे. प्रभाग पाचमध्‍ये सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गट नेते भारत खामकर व भाजपचे स्वप्नील भिलारे यांच्यात दुरंगी, तर सर्वसाधारण महिला राखीवमधून ज्योती संतोष काळे, भाजपच्या ज्योती सचिन गांधी व अपक्ष सुनीता धनंजय मलटणे अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप असा अटीतटीचा सामना रंगणार आहे.

आजी- माजी पदाधिकाऱ्यांत चुरस :

प्रभाग क्रमांक सहामध्‍ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांमधून राष्ट्रवादीच्या रेणुका गणेश जाधव, भाजपच्या माजी उपाध्यक्षा डॉ. जागृती मकरंद पोरे, शिवसेनेच्या विमल प्रताप लोखंडे, तर सर्वसाधारणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चरण गायकवाड आणि भाजपचे शहराध्यक्ष विजय ढेकाने यांची लढत रंगणार आहे. आजी- माजी पदाधिकाऱ्यांच्या लढतीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Wai Municipal Election, NCP vs BJP, Makarand Patil, Shivendraraje Bhosle
Shivendraraje Statement : पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या भाजप महिला नेत्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा....

चौरंगी लढत लक्षवेधी

सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शैलेंद्र देवकुळे यांच्यापुढे प्रभाग सातमधून भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांचे चिरंजीव कुलदीप शिंदे यांचे आव्हान आहे, तर महिलांमध्ये राष्ट्रवादीच्या विजया पांडुरंग खोपडे व भाजपच्या केतकी विजय मोरे यांच्यातील सामना रंगणार आहे. प्रभाग आठमध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीतर्फे अजित शिंदे, भाजपचे अजित वनारसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश देशमाने व अपक्ष राजेंद्र देशमाने अशी चौरंगी, तर महिला राखीवसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. पद्मश्री प्रफुल्ल चोरगे व अपक्ष पद्मा विष्णू पिसाळ अशी दुरंगी लढत आहे. डॉ. पद्मश्री चोरगे या माजी नगरसेवक प्रदीप चोरगे यांच्या सूनबाई असून, याठिकाणी पद्मा पिसाळ यांच्यासाठी भाजपने उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

राष्‍ट्रवादीला पहिला कौल

प्रभाग नऊमध्‍ये अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या रेखा कांताराम जाधव यांची बिनविरोध निवड झाली. तर सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश जायगुडे, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदीप जायगुडे, शिवसेनेचे नीलेश मोरे, अपक्ष माजी नगरसेवक प्रदीप जायगुडे आणि सुशील जायगुडे अशी पंचरंगी लढत होत असून, या प्रभागात भावकीच्या मतविभागणीवर विजयाचे गणित अवलंबून आहे.

सावंतांच्‍या प्रभागावर लक्ष

प्रभाग दहामध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातील महिलांमध्‍ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा नीलिमा खरात आणि अपक्ष माजी नगरसेवक राजेश गुरव यांच्या पत्नी संगीता गुरव यांच्यातील सरळ लढत तर सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुप्रसाद ऊर्फ सनी चव्हाण, शिवसेनेचे योगेश फाळके, अपक्ष संदीप डोंगरे यांच्यातील तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे.

प्रभाग अकरामधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष गोंजारी व भाजपचे संग्राम सपकाळ, तर सर्वसाधारण महिला राखीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला सुनील शिंगटे, भाजपच्या निशिगंधा दिलीप सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोनिका प्रकाश चव्हाण, दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रीती नीलेश सावंत, भाजपच्या नूतन गिरिधर मालुसरे, शिवसेनेच्या अस्मिता गणेश सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सरला नारायण सोनवणे हे उमेदवार रिंगणात आहेत. माजी उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांचा हा प्रभाग असून, ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याने याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com