

Solapur, 02 November : सहकार कायदा कलम ११० अ अन्वये मे २०१८ मध्ये सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाले असले तरी आम्ही या कारवाईपूर्वीच एप्रिलमध्ये संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे आमच्यावर दोन टर्म अपात्रतेची कारवाई होत नाही, असा युक्तीवाद माजी संचालक संजयमामा शिंदे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे यांच्या वतीने ॲड. उमेश मराठे यांनी केला आहे.
दुसरीकडे, बँकेच्या नुकसानापोटी सहकार कायदा कलम ८८ अन्वये आमच्यावर निश्चित झालेली वसुलीची रक्कम भरण्यास आम्ही तयार आहोत; परंतु ही रक्कम भरून घेता येणार नसल्याचे लेखीपत्र बँकेने आम्हाला ३० ऑक्टोबर रोजी दिल्याचा युक्तीवाद संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे या पाच माजी संचालकांच्या वतीनेही ॲड. मराठे यांनी केला आहे.
या युक्तीवादांवर बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार उद्या (मंगळवार, ता. ३ नोव्हेंबर) निर्णय देणार आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २०१ जणांनी २३८ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी आज बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्यासमोर झाली. सुनावणीसाठी उपनिबंधक उमेश पवार, सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे, सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे, प्रशासन अधिकारी संतोष वरपे आदी उपस्थित होते.
माजी संचालकांना निवडणूक लढण्यासाठी कलम ८८ आणि कलम ११० अनुसार झालेली कारवाई हे प्रमुख दोन अडथळे होते. छाननीच्या पहिल्या टप्प्यात या दोन्ही प्रकरणांशी संबंधित असलेल्या उमेदवारांची प्रकरणे दुपारी ३ नंतर सुनावणीसाठी घेण्यात आली होती. उमेदवारांच्या वतीने ॲड. उमेश मराठे, ॲड. अभिजीत कुलकर्णी, ॲड. अभय इनमादार यांच्यासह इतर वकिलांनी बाजू मांडली.
संजय कोकाटे (माढा सोसायटी मतदारसंघ), सविता गायकवाड, सुनीता खुणे, वीणा जोकारे (महिला मतदारसंघ), बिरप्पा इंगळे, सत्यवान कांबळे, पूर्वा वाघमारे, येदा दुपारगुडे (अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघ), भीमराव येडवे, नागनाथ कदम, जमीर सुतार, लतिफ तांबोळी, जयकुमार माने (इतर मागासवर्गीय मतदारसंघ), युवराज राठोड (भटक्या जाती/विमुक्त जमाती मतदारसंघ) या १४ जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
राम सातपुते, रणजित शिंदे यांच्या अर्जावर हरकत
माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांना सोसायटीत सभासद, संचालक करून घेण्यासाठी बनावट रेकॉर्ड केल्याची हरकत आणि रणजित शिंदे यांच्याकडे जगदंबा सूतगिरणीमधील देणी थकीत असल्याची हरकत घेण्यात आली आहे. या हरकतींवर सुनावणी झाली असून उद्या (मंगळवार, ता. ३) या संदर्भात आदेश काढला जाणार आहे, हरकत फेटाळली जाते की मंजूर केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- एकूण अर्ज : २३८
- हरकतींशिवाय मंजूर अर्ज : १८१
- अर्जावर हरकती : ४३
- नामंजूर अर्ज : १४
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.