अडीच वर्षांत विरोधक जे वागले तो हलकटपणा : यशवंतराव गडाखांनी व्यक्त केला संताप

माजी खासदार यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी त्यांचे विरोधकांवर जोरदार टीका केली.
Yashwantrao Gadakh
Yashwantrao GadakhSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेत खरा गट कोणता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोचला. शिवसेनेचे खासदारही आता भाजपच्या गोटात सहभागी होऊ पाहत आहेत. शिवसेनेच्या अशा राजकीय स्थित्यंतराच्या काळात शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या शंकरराव गडाख यांनी त्यांच्या मतदार संघातील जनतेसमोर येत भूमिका मांडली. त्यांनी गडाख कुटुंब शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राहणार हे स्पष्ट केले. या प्रसंगी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार यशवंतराव गडाख ( Yashwantrao Gadakh ) यांनी त्यांचे विरोधकांवर जोरदार टीका केली तसेच शंकरराव गडाख यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला. ( What the opposition has done in the last two and a half years is weakness: Yashwantrao Gadakh expressed anger )

यशवंतराव गडाख म्हणाले की, सत्ता असताना माणसे गोळा होतात. मात्र सत्ता गेल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले म्हणजे शंकरराव व संघटनेवर तुमचे प्रेम आहे हे सिद्ध होते. मला तीन-चार फोन आले. काहींनी विचारले जय श्रीराम करायचे का? काय भानगड आहे. मी म्हणालो, मेळाव्याला या म्हणजे कळेल.

Yashwantrao Gadakh
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

ते पुढे म्हणाले की, शिंदे गटात गेलो असतो तर मंत्रीपद कायम राहिले असते. मात्र ज्या उद्धव ठाकरेंनी स्वतःहून बोलावून घेतले. कॅबिनेट मंत्रीपद दिले. महाराष्ट्र सरकारमधील महत्त्वाचे खाते दिले. वेळ प्रसंगी अशा माणसाला सोडणे बरोबर नाही. सत्ताच ही काही नेहमी नसते हे मी शंकररावला सांगू इच्छितो. आपली संघटनेची ताकद आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ती ताकद आपण दाखवून दिली. वेळेवर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. लढत दिली आणि पाच जागा निवडून आणल्या. विधानसभाही अपक्ष लढविली. तरीही आपण विश्वासाने एक राहिलात. त्याचे फळं आपल्याला मिळालं, असे त्यांनी स्पष्ट केले.

शंकरराव गडाख यांनी अडीच वर्षे मंत्रीपदात जे काम केले त्याचा नेवासे तालुक्याला अभिमान आहे. जिल्ह्यात शिवसेनेची संघटना बळकट केली. नेवासे तालुक्याला कधी नव्हे एवढा भरीव निधी आणला. अनेक विकासकामे मंजूर करून आणले. त्या सगळ्याला आता ब्रेक लागला आहे. ती कामे स्थगित करण्यात आली. मात्र वेळ काही थांबून राहत नाही, असा अनुभवी सल्लाही त्यांनी दिला.

Yashwantrao Gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

राजकारण बदलते. ते आताही बदलले. आपण आपले स्थिर राहिलेले चांगले. संघटनेची ताकद, संघटनेचा जोर, संघटने बद्दल प्रेम कायम स्वरुपी ठेवले पाहिजे. त्या ताकदीवर आपण काहीही करू शकतो. नेवासे तालुक्यात दोन-अडीच वर्षांत विरोधक जे वागले तो अत्यंत हलकटपणा होता. आम्हाला घरगुती दुःख झाले. भारतीय संस्कृती अशी आहे की, प्रेमाने जवळ येतात. धीर देतात. त्यांनी उलट शंकररावांना कोर्टात खेचले. घरगुती कारणापर्यंत गेलात. तुम्हाला बोटाला धरून मी तालुक्यात फिरविले. लोकांच्या ओळखी करून दिल्या. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला. जिल्ह्यातला कोणी विरोधक अशा पद्धतीने वागला नाही. मलाही पुष्कळ विरोध झाला. मात्र त्यावेळचे विरोधक अशा खालच्या पातळीवर गेले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुळा सहकारी साखर कारखान्याने डिस्लरी, इथेनॉल प्रकल्प उभे केले. लोकांचे पेमेंट थकविले नाही. राज्यात आदर्श निर्माण होईल असे काम केले. हीच एकजूट कायम ठेवा. शंकररावांच्या पाठीशी उभे रहा. आपली बॅटच बरी आहे. आपल्याला 30 हजाराचे लिड या बॅटने दिला. पुढच्या वेळी हा लिड 50 हजारापर्यंत गेला पाहिजे, अशा पद्धतीने काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Yashwantrao Gadakh
यशवंतराव गडाख यांनी सवंगड्यांसह घेतला आमटी, भाकरीचा आस्वाद

काही विरोधात गेलेले लोकही आता पुन्हा जवळ आले आहेत. दिलजमाई झाली आहे. महाराष्ट्रात काहीही होओ. इन्कटॅक्सचा नाद, ईडीचा धाक दाखविला जातो. तो आपल्याला ही दाखविला गेला मात्र आपण हललो नाही. हलणारही नाही. मंत्रीपद गेले, सत्ता गेली याचे वाईट वाटले. कारण तालुक्याला आलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक निधीची कामे थांबल्याचे खरे वाईट वाटत आहे. आपल्या बळावर संघटना टिकवू. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकायच्या आहेत.

माझ्यावरही कोर्ट कचेऱ्या झाल्या. मतदारयादीतून नाव काढून टाकण्यापर्यंत झाले. तरीही मी डगमगलो नाही. उभा राहिलो, तो तुमच्या सर्वांच्या जीवावर. अनेक ठिकाणचे सर्वपक्षीय आमदार मला भेटतात आणि सांगतात शंकररावने आमची कामे केली. चांगला सुस्वभावी व्यक्ती म्हणून शंकरराव गडाख यांनी नाव कमावले याचा अभिमान मला व तालुक्याला आहे. दोन अडीच वर्षे बरे गेले आता यापुढे संघर्ष आहे. या संघर्षात कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com