कऱ्हाड : गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला एफआऱपी अधिक दोनशे, यावर्षी अगोदर एकरकमी एफआरपी अधिक साडेतीनशे रुपये, पारदर्शक काटे, एफआऱपी सुत्रात बदल करुन इथेनॉल उत्पन्नाचा फायदा थेट शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. मात्र, सहकार मंत्र्यानी त्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याविरोधात १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यास शेतकऱ्यांनी, कारखानदारांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. दरम्यान, मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही, याचा अर्थ मी राजकारण सोडलं नाही. शेतकऱ्यांसाठी शेतकरी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, या हंगामात उसाला विनाकपात एक रकमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावेत या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. खते, औषधे, मजुरी यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असताना ऊस दर मात्र त्या पटीत वाढत नाही. कृषी मुल्य आयोग एफआरपी ठरवताना या बाबी का लक्षात घेत नाहीत. साखर कारखानदार शेतकऱ्यांची लूट करत आहेत.
ऊसापासून तयार करण्यात येणार्या उपपदार्थांचा नफा शेतकर्यांना दिला जात नाही. त्याचा हिशोबही कारखानदार देत नाहीत. त्यामुळे उपपदार्थांचे नफा शेतकर्यांना मिळावा अशी आमची मागणी आहे. एफआरपी ठरविण्याचे सूत्र नव्याने तयार करायला हवे अशी मागणी कृषी मुल्य आयोगाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे याबाबतची शिफारस करणार असल्याचे कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. या हंगामात दीडशे रूपये वाढवून दिले असे सांगितले जात असले तरी ही शेतकर्यांनी फसवणूक आहे.
त्यामुळे गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला एफआऱपी अधिक दोनशे, यंदा आधी एकरकमी एफआरपी आणि कारखाने बंद झाल्यावर साडेतीनशे रुपये, काटामारीवर कायमची उपाययोजना आणि पारदर्शक काटे, गोपीनाथ मुंढे ऊसतोडणी मजुर महामंडळामार्फतच मजुरांचा पुरवठा करावा तरच टनाला १० रुपये द्यायला आम्ही तयार आहोत.
अलिकडच्या काळात इथेनॉलच्या उत्पन्नातुन साखर काऱखान्यांचे उत्पन्न वाढले मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे एफआऱपी सुत्रात बदल करुन इथेनॉलचे उत्पन्नाचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळावा असे सुत्र तयार करावे यासाठी आम्ही आंदोलन पुकारले आहे. त्यास शेतकरी आणि कारखानदारांनीही पाठिंबा द्यावा. यावेळी शेट्टी यांनी मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही, याचा अर्थ राजकारण सोडलं नाही. शेतकऱ्यांसाठी शेतकरी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदाभाऊंची संघटना बेदखल
माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतुन फुटल्यानंतर स्वतःची रयत क्रांती शेतकरी संघटना काढली आहे. त्याच्या संघटनेबाबत माजी खासदार शेट्टी यांना विचारले असता असल्या बारीक सारिक संघटनेवर मी बोलत नाही. मला त्यासाठी वेळही नसतो. मला माझ्या संघटनेबाबत विचारा, असे म्हणुन त्यांच्या संघटनेला त्यांना बेदखलच केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.