

Solapur, 05 January : महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज (ता. 05 जानेवारी) सोलापुरात आले होते. सोलापुरात इनकमिंगमुळे भाजपतील अनेक निष्ठावंतांनी बंडखोरी केली आहे. दोन्ही देशमुखांनीही निष्ठावंतांच्या पाठीशी उभं राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, याच निष्ठावंतांना बंडखोर ठरवत आधी शहराध्यक्षा आणि आता खुद्द प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी 24 तासांत माघार घेऊन भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर करा; अन्यथा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. या इनकमिंगमुळे आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत अस्वस्थ झाले होते. काहींनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला होता. खुद्द विजयकुमार देशमुख यांनीही आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती.
दोन्ही देशमुखांच्या विरोधानंतर पक्षात नव्याने आलेल्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे भाजपतील अनेक बड्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी माघार घ्यावी, असे हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतरही काही ठिकाणी निष्ठावंतांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे, त्यांनाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मेळाव्यातून इशारा दिला आहे.
भाजपच्या उमेदवारांसमोर जे बंडखोर म्हणून उभे आहेत, अशांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करा, अशी विनंती करायला मी सोलापुरात आलो आहे. आपल्या पार्टीचं सरकार आल्यानंतर अशांनाही आम्ही स्थान देणार आहोत. आम्ही उद्याचा एक दिवस वाट बघणार आहोत. मात्र, बंडखोरावर मला अध्यक्ष म्हणून कारवाई करावीच लागेल, असा इशारा बंडखोरांना दिला आहे.
जे कोणी बंडखोर आहेत, त्यांनी आपल्या उमेदवाराला आजच्या आज पाठिंबा द्यावा, अशी विनंती मी सर्व बंडखोरांना करत आहे राज्य आणि जिल्हा पातळीवरील अनेक समित्या आहेत. पालिकेत सत्ता आल्यानंतर तेथेही संधी मिळू शकते, याचा विचार बंडखोरांनी करावा. वर्षांनुवर्ष पक्षासाठी कार्य केलेल्या कार्यकर्त्यांवर बंडखोरी केली; म्हणून कारवाई करावी, याचं वाईट वाटतं. पण पक्षशिस्तीसाठी 24 तासांत बंडखोरी मागे न घेतल्यास कारवाई करावी लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या भागात जो फेक नरेटिव्ह सेट करण्यात आले होते. त्याचे आपण साक्षीदार आहोत, त्यामुळे येणारे 10 दिवस गाफिल राहू नका. आपल्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही सर्वांनी ही निवडणूक डोक्यावर घेतली पाहिजे. प्रत्येक बूथ तुम्हा आम्हा सर्वांना जिंकायचा आहे. आपल्याला 51 टक्केच मतदान जिंकायचं आहे.
कमळावर तुम्ही जेव्हा बटन दाबाल, तेव्हा तुमचा मतदान हे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसला होणार आहे. येत्या 15 तारखेला तुम्ही कमळाकडे लक्ष द्या, पुढील 5 वर्षे देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे लक्ष देतील. येत्या 10 तारखेला सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे, असेही भाजप प्रदेशाध्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आपल्याला 2047 मध्ये जो विकसित भारत तयार करायचा आहे, त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. हेच नगरसेवक विकसित सोलापूर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.