Sangli News : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच सांगलीतील वातावरण गेल्या दोन दिवसापासून चांगलेच तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसापूर्वी सांगली दौऱ्यावर आले होते. त्या वेळी काहींनी त्यांच्यासमोर फलक घेऊन निषेध केला. त्यासोबतच कार्यक्रमस्थळी काहींनी निवेदन दिले. यासह यंत्रणा भेदून अनेकांनी प्रवेश केला. त्यामुळे या दौऱ्यावेळीचा हलगर्जीपणा भोवणार आहे. याबाबत पोलिस, प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. बुधवारी सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू होते. यातील दोषी कारवाईच्या भीतीने धास्तावले आहेत.
सांगलीत गेल्या काही दिवसांपासून भयमुक्त, नशामुक्त अभियान सुरू आहे. त्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ मागितली होती. मात्र, सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना ही भेट नाकारण्यात आली. कार्यक्रमापूर्वी निमंत्रक तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभूराज काटकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
मुख्यमंत्री सीएम फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे हेलिकॉप्टर कवलापूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ताफा माधवनगर रस्ता मार्गे कार्यक्रमस्थळी निघाला. त्यावेळी संजयनगर हद्दीत काही आंदोलकांनी फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी यंत्रणा भेदून अनेकजण गर्दी करताना दिसून आले. मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारे कृत्य अनेक कॅमेऱ्यांत टिपले गेले.
मुख्यमंत्री फडणवीस यांना काहींनी खुद्द पोलिस अधीक्षकांसमोरच निवेदन दिल होते. या महत्त्वाच्या दौऱ्यात होणारा हा हलगर्जीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. पोलिस, प्रशासन धारेवर धरले असून सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागवल्याचेही समजते आहे. सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सायंकाळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदारांची बैठक घेतल्याचेही समजते. लवकरच दोषींवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेचे दोष आता समोर आले आहेत. वरिष्ठ कोणती कारवाई करणार, हे यथावकाश समोर येईल. मात्र, वरिष्ठांनी हलगर्जीपणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
'या' कारणांमुळे उडाला गोंधळ उडाला गोंधळ
सांगलीत कवलापूर येथे अधिकृत अशी तीन हेलिपॅड बनवण्यात आली आहेत. मात्र, काहींच्या हट्टापोटी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात उतरवण्याचा घाट सुरू होता. त्यासाठी हेलिपॅड बनवण्यात आले होते. परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त, सरावही झाला होता. आदल्यादिवशी रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून दौरा आल्यानंतर कवलापूर विमानतळ निश्चित झाले. त्यानंतर सारा बंदोबस्त त्या ठिकाणी नेण्यात आला. यामुळे गोंधळ उडाल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.