

Mumbai News: महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सोमवारी(ता.22) सुरू झालं. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पद्मविभूषण व प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनावर सभागृहात श्रद्धांजली वाहताना शोकप्रस्ताव ठेवण्यात आला. तोच प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अक्षम्य चुका घडल्या. इतकंच नव्हे तर आशा ऐवजी त्यांनी अशाही उच्चार केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. मोठ्या वादंगानंतर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर दिवंगत आशा भोसले यांच्या निधनावर ठेवण्यात आलेल्या शोकप्रस्तावावरुन उद्भवलेल्या वादावर अखेर पडदा टाकला आहे. ते म्हणाले, अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातील कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असे वक्तव्य करू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
नार्वेकर म्हणाले, शोक प्रस्तावाची जी प्रत माझ्याकडे आली, ती अस्पष्ट होती. त्यात चुका होत्या. माझ्याकडून जी चूक झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेले दोन दिवसांपासून पेटलेल्या राजकीय वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.
तसेच ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी आपल्या एक्स पोस्टमधून राहुल नार्वेकर यांना चांगलंच डिवचलं होतं. त्यांनी उपरोधिकपणे पोस्टमधून राहुल नार्वेकर यांनी कितीही चुका केल्या तरी मी काहीही बोलणार नाही… पुन्हा माझी वकिलीची सनद रद्द होईल अशा शब्दांत डिवचलं होतं.
राहुल नार्वेकर आहेत ते… त्यांना वाटेल तेव्हा कुणाकडूनही काहीही लिहून घेतील. ते संविधानाचा अपमान करतील, कायदेशीरतेचा अपमान करतील, भाषेचाही अपमान करतील… पण त्यांचे कुणी काही बिघडवू शकत नाही. आणि नंतर सभागृहात सर्वांना शहाणपण शिकवायलाही ते तयार असतात असा खोचक टोलाही सरोदे यांनी राहुल नार्वेकर यांना लगावला होता.
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी संताप व्यक्त केला होता. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आल्याचं ते म्हणाले होते. तसेच वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? अशा शब्दांत राज ठाकरेंनी संतप्त भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत,असा टोलाही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून नार्वेकरांना लगावला.
राज ठाकरेंनी राहुल नार्वेकरांच्याशोक प्रस्तावाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. ते म्हणाले,यावेळी सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल.
तसेच गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवरही टोलेबाजी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.