
Raj Thackeray: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध पेटलं त्यानंतर नुकताच दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटचा सामनाही पार पडला. या सामन्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. पण मनसे अध्यक्ष राज टाकरे मात्र शांत होते, पण आता त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून सरकारवर चांगलेच फटकारे ओढले आहेत. याद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर तर मिसळलाच आहे पण भाजपपासून आणखी दूर जात असल्याचे हे संकेत असल्याचं दिसून आलं आहे.
राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात एकीकडं काश्मीरमधील सुंदर पहलगामचं दृश्य चितारण्यात आलं आहे. त्यातच एका बाजुला दहशतवाद्यांनी या ठिकाणी पर्यटकांना गोळ्या घालून त्यांचा जीव घेतल्यानंतर पडलेला मृतदेहांचा खच दाखवण्यात आला आहे. त्याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे पुत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अर्थात ICCचे अध्यक्ष जय शहा दिसत आहेत. जय शहा एका मृतदेहाचा हात पकडून त्याला सांगत आहेत की, दुबईत आशिया कप स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला आहे. "अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले!" या सर्व परिस्थितीकडं अमित शहा हाताची घडी घालून उभे राहून सर्व तमाशा शांतपणे पाहत आहेत. या व्यंगचित्राला राज ठाकरेंनी प्रश्नार्थक कॅप्शन दिलं आहे. "नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं?"
दरम्यान, राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राचं विश्लेषण करायचं झाल्यास गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं विरोधीपक्षांनी ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर टीकेचा सूर लावला होता. पाकिस्ताननं काश्मीरमध्ये इतका मोठा दहशतवादी हल्ला घडवला त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या युद्धाच्या स्थितीत सीमावर्ती राज्यांमध्ये पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये काही नागरिकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं युद्धविराम झाला.
इतकं सगळं घडलेलं असतानाही आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना कसा काय खेळू शकतो? आता मोदी सरकारचं देशप्रेम, राष्ट्रवाद कुठे गेला? असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांनी उपस्थित केले होते. त्यांच्या सुरात आता राज ठाकरेंनी देखील आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून केंद्र सरकारला सवाल विचारत आपले सूर मिसळले आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या ताज्या मुद्द्यावरुन मात्र राज ठाकरेंनी भाजपला आणि विशेषतः भाजपचे कथित चाणक्य असलेल्या अमित शहांना आपल्या ब्रशच्या माध्यमातून चांगलेच फटकारे ओढले आहेत. एकूणच हा क्रिकेक सामना खेळून आणि जिंकून आपण नेमकं काय साध्य केलं? अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.
दरम्यान, दुसरीकडं राज ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केल्यानं ते आता भाजपपासून आणखी दूर जात असल्याचे संकेत आहेत. कारण येत्या मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत भाजप राज ठाकरे आपल्यासोबत अर्थात महायुतीसोबत येतात का? याची चाचपणी करत आहेत. त्यासाठी राज ठाकरेंना कुठल्याही प्रकारे नाराज करण्याची रिस्क ते घेताना दिसत नाहीत.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई महापालिकेत विशेष काही होणार नाही असं जर भाजपच्या नेत्यांकडून बोललं जात असलं तरी हे हलक्यात घेणं भाजपला परवडणार नाही. म्हणूनच एकीकडं उद्धव ठाकरेंना टार्गेट करत असताना राज ठाकरेंबाबत भाजपचा सॉफ्ट कॉर्नर स्पष्टपणे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.