Maharashtra Politics: महाराष्‍ट्रधर्म जागवणाऱ्या बंधूंनी परस्परांना धाडले लखोटे!

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी बंधुद्वयांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरिला आहे. हे दोन बंधू सोडून बाकी शिलेदारच त्यावर उलटसुलट बोलून, वार्ता प्रसवत आहेत. या पार्श्वभूमीवर या महाराष्‍ट्रधर्म जागवणाऱ्या बंधूंनी परस्परांना लखोटे धाडले. त्यातील तर्जुमा आमच्या हाती लागला. तो येणेप्रमाणे...
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance
Uddhav Thackeray Raj Thackeray AllianceSarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

राजमान्य राजश्री ज्येष्ठ बंधुवर्य,

चैत्र २९, शके १९४७., कृष्ण षष्ठी तिथीच्या दिनी स्वराज्याच्या रक्षणार्थ आप्तस्नेही माणसाशी साधलेल्या संवादप्रसंगी आम्ही उदारवृत्तीने वदलो होतो, की आम्हा भावांची कीर्ती बहुत. पण महाराष्ट्राचा महिमा त्याहून मोठा असे! स्वहित, गर्वाभिमान बाजूस ठेवून, जर स्वराज्याची आवश्यकता भासली, तर आम्ही एकाच पताकेखाली उभे राहू; हृदयाचा दगड करून एकसंध होऊ... हे बोल उच्चारले गेले ते पूर्वनिर्धारित प्रश्नांच्या उत्तरास अनुसरून. परंतु त्यात स्वराज्यभक्तीची गूढ प्रखरता होती. हे वचन इतिहासाच्या सुवर्णपृष्ठावर कोरले जावे इतके मोलाचे होते.

ही वाणी नव्हे जणू टाळीसाठी टाकलेली हाळीच होती. परंतु तोच समयी, सद्गदित होऊनही आपण नेहमीप्रमाणेच मौन धारण केले. मग आम्ही मनाशी विचार केला, ‘या टाळीसाठी ही टाळाटाळ जणू’ नि मग आम्ही दूरदेशी गमन केले, देशसीमेच्या बाहेर. परदेशगमन. आपणदेखील पश्चिमदेशी प्रयाण केले. अन् तेव्हाच इकडे अवघ्या महाराष्ट्र देशात खळबळ माजली. आपले काही सेनानी-शिलेदार तोंडी तलवारी चालवीत उलटसुलट वाणी करू लागले. आपले ते बोरुबहाद्दर ‘सामना’पटू कारभारी वारंवार गर्जू लागले. मग तो खबरीवर खबरींच्या मोहिमा चालवणाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय जाहला. तद्वत ह्याच सुमारास, आमचे बाळराजेंनी उद्गार काढिला, ‘दोन्ही बंधुराजांना कोणत्याही ना दूताची गरज. ना सांडणीस्वाराची. जर मनी आले, तर हे दोघे थेट परस्परांशी मसलतीने देशकार्यास्तव एकत्र येतील. यथावकाश आपणही महाराष्ट्रदेशास संबोधून वदलात, ‘महाराष्ट्राच्या मनाप्रमाणे होईल’.

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance
BJP Local Body Elections 2025: ‘स्थानिक स्वराज्य’साठी भाजपचा पुन्हा ‘माधव पॅटर्न’

तुमचे ‘सामना’पटू शिलेदार जसे ‘महाराष्ट्र’ आपल्या मुखी वेठीस धरीत वदततात, ‘महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही’,‘महाराष्ट्र ते सोसणार नाही...’ अशी वचने ते ठायीठायी करितात. जणू अवघ्या महाराष्ट्रास दुसरी दिनचर्याच नसे. त्यामुळे बंधुवर्य, तुमच्याही मुखी ‘महाराष्ट्र’ शब्द आला असावा. आमच्या आगगाडीचे सारथ्ययंत्र जे सध्या निःसत्व पडलेले... आपली मशाल जी मंदावलेली, ह्या दोघांनी पुन्हा तेजस्विता मिळवून मशालीने सारथ्य यंत्राचे इंधन प्रज्वलित करून अवघ्या महाराष्ट्रास (तूर्तास मुंबापुरीस) गवसणी घालण्याची आपली मनीषा दिसते. ‘ध’चा ‘मा’ करून ‘कमळाबाई’ने ‘ईडी’गारदी मजवरी धाडिले. तिला नेस्तनाबूत करण्याचा आपला मानस आम्ही जाणतो. किंतु आम्हाला आता ताक फुंकूनच प्यावे लागेल, कारण मागच्यावेळी आमचे ओठ पोळले. दोनवेळा आपण आम्हास रणात येकटेच सोडिले. यापुढे तसे होणार नाही, असा ‘मातोश्री’शपथेने आपला शब्द हवा. तेव्हाच आम्ही सहमोहिमेस सिद्ध होऊ.

इति लेखनसीमा!

आपला (एके काळचा) नम्र,

वक्ररेषामार्तंड सरनोबत,

दादर परगणा

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance
PMC Election 2025: म्हणून पुण्यात एक नगरसेवक कमी; अशी असेल नवी प्रभाग रचना, पिंपरी चिंचवडसाठी जुनी प्रभाग रचना

राजमान्य राजश्री बंधु‘राज’,

शुभाशयांनी परिपूर्ण पत्र प्राप्त जाहले. वाचोनि अंतर्यामी आनंदाचे विलोभनीय तरंग उठले. सप्रेम उद्गार बाहेर पडले, ‘अहाहा! काय हा माझा बंधू जिव्हाळ्याने लिहितो आहे.!’ मज अंत:करणातून उमटलेला हळवा हुंदका समोर असलेल्या मंद मशालीच्या ज्वालेस विझवू लागला, मग लगोलग ती जिवंत ठेवोनि प्रयत्नपूर्वक शिलगती ठेवली. बंधो, तू ज्या प्रसंगी जनमानसात महाराष्ट्रधर्माच्या रक्षणार्थ अहंकाराचिया त्यागाची प्रतिज्ञा केलीस. मज अंत:करणात अहंकारास केव्हांच थारा नव्हता. पण तू अहंकार बाजूला ठेवतोस म्हणोन, महाराष्ट्रभक्तांच्या मनाला काहीसा विसावा लाभोनि तयांना हायसे वाटले. बंधो, हे जाण की, स्वराज्यभूमीवर परकीय पावले रोवू लागले आहेत.

राजधानी मुंबापुरी हिंदी-गुजरांनी सांडोनि चालली आहे. ते पाहोनि अंत:करणात जळफळाट होतो. जनतेची हीच एक प्रार्थना, की आपण बंधुभावाने एकत्र येऊन स्वराज्याचा किल्ला पुन्हा भक्कम करू. महाराष्ट्र धर्म जागवू. ‘महाराष्ट्राच्या मनाप्रमाणे होईल’ असे मी वदलो, ते याचसाठी. परंतु आता या संवादात टाळीबिळीचा क्षुद्र विचार नको. आम्ही आता टाळी मागत नाही की देत नाही.आता आलिंगनच व्हावे, हाच मोठ्या मनाचा विचार आहे. आलिंगनप्रसंगी तुझे कुंचले, लेखणी अंगरख्यात लपवोन येऊ नकोस. मला उगाच ‘वाघनखे’ वाटतील... (इति मज पामराची विनोदसीमा!)

बंधो, आपण पूर्वी कधी भांडून वेगळे गेलोच नव्हतो. केवळ भिंती उभ्या राहिल्या होत्या. पण आता या भिंती पाडण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या रक्षणार्थ हा समयाचा सांगावाच जणू. हे ही सत्य की, शिलेदारांच्या खबरींवर नव्हे, आपल्या निर्णयांवरच जनतेचा विश्वास आहे. दोन वाघांना येका गुहेत आणण्यास कोल्ह्यांनी योजना का आखाव्यात? अवघा हास्यास्पद मामला. तेव्हा आपणच पाऊल पुढे टाकावे, हा काळाचा तगादाच समजावा.

बंधो, माझे ‘धनुष्य-बाण’ चोरीस गेले, नतद्रष्ट आमच्या तीर्थरुपांचे नाव हिरावत आहेत. तू आगीनगाडीच्या सारथ्ययंत्राची रंगसंगती-दिशा बदलून हाकीत आहेस. आम्ही मशाल पाजळत आहो. पण या दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रदेशी नवचैतन्य निर्माण होईल. ‘कमळाबाई’चे उन्मत्त डोलारे, कट-कारस्थाने नेस्तनाबूत होतील. बंधो, तुझे वाग्बाण खासच परंतु तू मतदारांना भुलवावेस, हा स्नेहसल्ला देतो. या मुंबापुरीत पुन्हा एकदा आपले निशाण उंचावू दे. नाही तर तुला दादरच्या, आम्हाला वांद्र्याच्या गढीतच अडकोनि पडावे लागेल. तत्राप, तू लगोलग आमच्या वांद्र्याच्या गडावर आलिंगनभेटीस यावे. हा केवळ आग्रह नव्हे, तर मोठ्या भावाची प्रेमाची आज्ञाच.

इति लेखनसीमा!

नेहमी आपलाच,

वक्रबोलमार्तंड सरनोबत, 

वांद्रे परगणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com