Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे दिले आहे. त्यानंतर आता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे होणार आहे. त्यामुळे याचा निकाल काय लागणार, याची चर्चा जोरात सुरू आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला होता. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी सूचक वक्तव्य केले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे दिले आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या बहुमत आहे. आमदार, खासदारांची सर्वाधिक संख्या अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे आयोगाने पक्ष चिन्ह आणि पक्षाचा ताबा त्यांच्या गटाकडे दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १५ फेब्रुवारीपर्यत देणार आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित होता, येत्या काळात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत झाले तोच निकाल लागला आहे. त्यामुळे येत्या काळात फारशा अपेक्षा करणे चुकीचे आहे , अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केली आहे.
(Edited By- Sachin Waghmare)