BJP-RSS : लोकसभेचा दणका जिव्हारी; भाजप अन् PM मोदींनी संघाशी पुन्हा जुळवून घेतले?

BJP-RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच नागपूर दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयात आले होते.
Narendra Modi Mohan Bhagwat
Narendra Modi Mohan Bhagwatsarkarnama
Published on
Updated on

BJP-RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच नागपूर दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयात आले होते. या भेटीत त्यांनी संघाचे आणि संघाच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. संघ हा भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष आहे. एक अविरत चालणारा यज्ञ आहे. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचे काम केले आहे, असे म्हणत संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानही अधोरेखित केले.

मागच्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाबद्दल काढलेले हे पहिलेच गौरवोद्गार नाहीत. संधी मिळेल त्या व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा केवळ उल्लेखच केलेला नाही, तर आपल्यासाठी संघ किती महत्वाचा आहे, आपली पार्श्वभूमी संघाची असल्याबद्दल कसा अभिमान आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यामुळे वर्षभरापूर्वी एकमेकांशी अंतर ठेवून असलेले संघ आणि भाजप पुन्हा जवळ येत आहेत का? लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका भाजपला पुन्हा संघाच्या जवळ घेऊन आला आहे का? असे सवाल विचारला जात आहे.

जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने वादळ :

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संघाबद्दल केलेल्या विधानावरून अक्षरश: वादळ उठले होते. "भाजपला एकवेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. पण पक्षाने आज विस्तार केला आहे. भाजप स्वत:चा कारभार करण्यासाठी सक्षम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वैचारिक आघाडी असून ते त्यांचं काम स्वतंत्रपणे करतात." असे ते म्हणाले होते. नड्डा यांच्या या वक्तव्याने देशभरातली स्वयंसेवक नाराज झाले होते. याचा परिणाम म्हणजे नाराज स्वयंसेवकांनी निवडणुकीपासून अंतर राखले आणि लोकसभेला भाजपला बहुमतापासून दूर राहावे लागले.

लोकसभा निवडणुकीनंतर संघाच्या नेत्यांचेही भाजपच्या नेतृत्वाबद्दल स्वर बदलले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी यांचे कान टोचले होते. खरा ‘सेवक’ ‘अहंकारी’ असणे परवडणारे नाही. देशाचा कारभार ‘सर्वसंमतीने’ चालवण्याची गरज आहे. लोकशाहीत दोन्ही पक्ष शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहेत. निवडणुकीत एकमेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना ‘मर्यादा’ पाळावी लागली आहे. तसेच मणिपूरकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे भागवत यांनी सांगितले होते.

Narendra Modi Mohan Bhagwat
PM Modi Visit RSS Headquarters : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संघ कार्यालयाला भेट, भाजप अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लागणार!

सरसंघचालकांच्या टीकेनंतर संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’ मध्ये भाजपला आरसा दाखवणारे लेख प्रकाशित झाले होते. संघाचे दुसरे नेते इंद्रेश कुमार यांनी बहुमत न मिळण्यासाठी पक्षाच्या उद्धटपणाला जबाबदार धरले होते. याशिवाय महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याच्या भाजपच्या निर्णयाला ‘अनावश्यक राजकारण’ आणि ‘टाळता येणारी हेराफेरी’ असे म्हणून काही संघ नेत्यांनी भाजपला फटकारले होते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा तळातला कार्यकर्ता दुखावला गेला, असे निरीक्षण संघाच्या स्वयंसेवकांनी खाजगीत बोलून दाखवले होते.

टीकांनंतर जुळवून घेतले?

त्यानंतर भाजपाने संघाशी जुळवून घ्यायला सुरू केले. हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये संघ आणि भाजप यांचा समन्वय दिसून आला. संघ आणि भाजप या दोन स्वतंत्र संस्था असून संघ राजकीय निर्णयात हस्तक्षेप करत नाही, अशी संघाची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. आता मात्र महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या सरकारमध्ये आणि संघामध्ये काही वैचारिक देवाणघेवाण होताना सातत्याने दिसते. पंतप्रधान मोदी संधी मिळेल त्या व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करताना दिसतात.

फेब्रुवारीत दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांनी संघाची प्रशंसा केली. "एका शतकापूर्वी एका सुप्रसिद्ध मराठी माणसाने महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बीज रोवले. या बीजाचा आता महावृक्ष झाला असून शताब्दी वर्ष साजरे होत आहे. गेल्या शंभर वर्षांत अनेक सांस्कृतिक प्रयत्नांच्या माध्यमातून वेदांपासून विवेकानंदांपर्यंत चालत आलेली भारताची महान परंपरा आणि संस्कृती पुढे नेत नव्या पिढीपर्यंत पोहोचवली. इतर लाखो लोकांप्रमाणेच संघाकडून देशासाठी जगण्याची प्रेरणा मिळणे हे आपले अहोभाग्य आहे.

Narendra Modi Mohan Bhagwat
PM Modi in Nagpur : पहिल्यांदाच RSS मुख्यालयात, दीक्षाभूमीला अभिवादन; पंतप्रधान मोदींचे खास फोटो...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनच आपल्याला मराठी भाषा आणि परंपरा यांच्याशी जोडले जाण्याची संधी मिळाली होती." अशीही पुस्ती मोदींनी यावेळी जोडली होती. त्यानंतर मार्चमध्ये अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांना दिलेल्या मुलाखतीत मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या जडणघडणीत कसे योगदान दिले यावर मांडणी केली. संघ ही अद्वितीय संघटना असून अशी संघटना इतर कुठे असू शकत नाही, असे मोदी म्हणाले होते. लाखो लोक संघाशी जोडलेले असून आयुष्यात ध्येय असणं, राष्ट्र हेच सर्वस्व असणे आणि लोकांची सेवा करणे ही शिकवण संघाकडून मिळाल्याचे मोदी यांनी सांगितले होते.

त्यांच्या आयुष्यातील संघाचे योगदानही त्यांनी या मुलाखतीत मांडले होते ."संघाच्या तालमीत घडत असताना मला आयुष्याचं ध्येय उमगलं. त्यानंतरचा सहवास लाभला, त्यातूनला खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे माझा आध्यात्मिक पाया मजबूत झाला. मला शिस्त आणि ध्येयपूर्ण आयुष्य मिळाले. संतांच्या मार्गदर्शनामुळे मला आध्यात्मिक मार्ग मिळाला. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद यांची शिकवण आणि संघाच्या सेवादित तत्वज्ञानाने मला घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असेही ते म्हणाले होते.

थोडक्यात मागच्या तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाबद्दल व्यक्त केलेली भूमिका, कृतज्ञता या गोष्टी संघाशी पुन्हा जुळवून घेतल्याचे संकेत देत आहेत हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com