

Parbhani News : परभणी जिल्हयातील राजकारणात आतापर्यंत खासदार संजय जाधव व मंत्री मेघना बोर्डीकर एकमेकांचे विरोधक राहिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून संजय जाधव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज होते. त्यामुळे त्यांचा महायुतीमधील नेत्यासोबतची जवळीक वाढली होती. त्यामुळे संजय जाधव लवकरच महायुतीसोबत येणार अशी चर्चा परभणीच्या राजकारणात रंगली होती. मात्र, खासदार जाधव यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाला आठ दिवसापेक्षा अधिक काळ झाला असतानाच पक्षांतरासाठी संजय जाधव यांची पहिली पसंती शिंदेंची शिवसेना नाही, तर भाजप होती, असा दावा मेघना बोर्डीकर यांनी केला होता. या त्यांच्या दाव्यातील हवा संजय जाधवांनी काढताना प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता ते सर्वजण आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर तोंडसुख घेतले. आम्ही कसे विकास कामे आणि निधीसाठी पक्ष सोडला हे स्पष्ट केले. त्यासोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागला, असे सांगीतले. त्यातच पक्षांतरासाठी संजय जाधव यांची पहिली पसंती शिंदेंची शिवसेना नाही, तर भाजप होती, असा दावा मेघना बोर्डीकर यांनी करीत खासदार जाधव यांना अडचणीत आणले आहे. हा त्यांचा दावा संजय जाधवांनी खोडून काढला आहे.
भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यासाठी मी कुठल्याच नेत्याला कधीही भेटलो नाही, किंवा त्यांना यावर बोललो सुद्धा नाही. त्यांच्याकडे काही इनपुट असेल तर त्यांनी द्यावे. मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुटे माझ्याबद्दल ठरवून स्क्रिप्टेड बोलतात. मी मूळ शिवसौनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी मूळ शिवसेनेमध्येच आलो आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांच्या विचारावर आणि आदर्शावर चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझा जन्म भगव्यात झाला शेवट सुद्धा भगव्यात होईल, यात फेरबदल होणार नाही, असे प्रत्युत्तर जाधव यांनी मंत्री बोर्डीकर यांनी केलेल्या दाव्यानंतर दिले आहे.
दरम्यान, येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तर होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात यामधील दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये संजय जाधव आणि ओम राजेनिंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच आता खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. राज्यमंत्रिपद हे पहिले दीड वर्ष संजय जाधव यांना तर त्यानंतर दीड वर्ष ओम राजेनिंबाळकर यांना मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.