Maharashtra Political Update : अजितदादांच्या विमान अपघातातबाबत रामदास कदम यांची मोठी मागणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : KDMC मध्ये महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, यासह आज 30 जानेवारी रोजीच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

America News : अमेरिकेत हिमवादळाचा तडाखा,25 जणांचा मृत्यू

अमेरिकेला भीषण हिमवादळाने तडाखा दिला असून संपूर्ण देश गोठला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर साडेसात लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. न्यूयॉर्कपासून टेक्सासपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले आहे. भीषण हिमवादळामुळे 18 राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हिमवादळाचा फटका विमान आणि रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. तापमान उणे 25 अंशांपर्यंत गेल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडून नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.

Ramdas Kadam On Ajit Pawar Accident : अजितदादांच्या विमान अपघातातबाबत रामदास कदम यांची मोठी मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्र सरकारने करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे शिवसेने पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केली. विमान धावपट्टीवर न येता ते तिरकं झालं, पायलटला नेमकी काय अडचण होती, हे समोर येणं आवश्यक आहे. विमान अपघातासंबंधी सगळ्या गोष्टी समोर याव्यात, अन्यथा विमान प्रवास हा सुरक्षित नाही, असा समज होण्याची शक्यता असल्याचं रामदास कदम म्हणाले.

Amravati Politics : अमरावती महापालिकेत काँग्रेसकडून माजी महापौर विलास इंगोले यांची गटनेतेपदी निवड

अमरावती महापालिकेत काँग्रेसकडून माजी महापौर विलास इंगोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विलास इंगोले हे सलग सात वेळा अमरावती महापालिकेमध्ये काँग्रेसकडून निवडून आले आहेत. जवळपास सात हजार पेक्षा अधिक मतांनी ते या निवडणुकीमध्ये विजय झाले आहे. महापालिकेमधील सर्वात अनुभवी आणि जेष्ठ नेते म्हणून त्यांची अमरावतीमध्ये ओळख आहे.

Sudhir mungantiwar : भाजपचे मुनगंटीवार यांचं मुंबई महापौरपदावरून शिंदेसेनेला थेट आव्हान

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करताना, एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला थेट इशारा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेन पक्षाचा महापौर करण्याचा दूर दूरपर्यंत विषय नाही, महापौर होईल, तर भाजपचाच होईल नाहीतर, आम्ही विरोधी पक्षात बसू, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महापौर पदाबाबत भूमिका मांडली. तसेच, दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कुठलीच रुची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, मुनगंटीवार यांनी शिंदेसेनेला थेट आव्हानच दिले आहे.

Praful Patel NCP : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेलांचं नावही चर्चेत

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. असं असलं तरी त्यांच्या नावापेक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडेच अध्यक्षपद सोपवण्याकडे कल आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आज किंवा उद्या राष्ट्रवादीचे नेते बारामतीत अजित पवारांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमानंतर पवार परिवाराला भेटून याबद्दल चर्चा करू शकतात.

Sunetra Pawar : 'सुनेत्रा पवारांनाच अध्यक्ष करा'; राष्ट्रवादीमधील नेत्यांचा मतप्रवाह

अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडेच अध्यक्षपद देण्यात यावं, अशी एक भूमिका राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी घेतली आहे. पक्ष अजित पवारांचा, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं ,असा एक मतप्रवाह आहे. अजित पवारांसारख्याच सुनेत्रा पवारही राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री दोन्ही होऊ शकतात, अशी नेत्यांची भूमिका आहे.

Praful Patel : उपमुख्यमंत्रिपदावर कोणाला बसवायचं हे आमदारांशी बोलून निर्णय घेणार; फडणवीसांबरोबर झालेल्या चर्चेवर पटेलांची प्रतिक्रिया

महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता. त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आज झालेल्या प्राथमिक चर्चेत काय झालं, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांनी सांगितलं. 'देवेंद्र फडणवीसांना आम्ही येवढचं सांगितले की, लवकरात लवकर निर्णय करायचा आहे. पक्षातील आमदारांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत. आज इतकेच आम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना सांगितलं. सुनेत्रा पवार यांच्या नावाची आज चर्चा केली नाही. कोणाला उपमुख्यमंत्रिपदावर बसवायचं हे आमदारांशी बोलून निर्णय घेणार आहोत. सगळ्यांच्या भावना समजून आम्ही निर्णय घेऊ,' अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

Mahesh Landge : अजितदादांचे स्मारक उभारण्यासाठी भाजप आमदार लांडगे यांचे पत्र

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महेश लांडगे यांनी एकमेकांवर अतिशय कठोर शब्दात टीका केली होती. मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लिहिलेलं पत्र सध्या पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय बनला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या इमारती समोर पूर्णाकृती ब्राँझ धातूचा पुतळा उभारून स्मारक उभारण्यात यावं, तसेच नवीन सभागृहाला अजित पवार यांचे नाव देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अजितसृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Dharashiv Politics : '...तर तुला बुक्काच लागला असता'; ठाकुर यांचा सावंत यांना टोला

'भाजपने काम केल नसतं, तर तुला बुक्काच लागला असता. पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीत पोराला बुक्का लागला अन् लागला मोठ्या गप्पा मारायला. जो माणूस मतदार संघातील जनतेशी इमान राखू शकत नाही, तो कोणाशी इमान राखणार', असा टोला भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांना लगावला आहे.

ठाण्यात शिवसेनेचे महापौर, तर उपमहापौर भाजपचा

ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उप महापौर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे महापालिकेत भाजप पक्षाचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका उपमहापौर पदाकरीता भाजपकडून कृष्णा पाटील अर्ज दाखल करणार आहेत.. महापौर पदासाठी शिंदे सेनेच्या वतीने विमल भोईर अणि शर्मिला पिंपोळकर हे अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा नाही: पटेल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आज सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले. सुनेत्रा वहिंनीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले.

KDMC Mayor: केडीएमसी महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल

केडीएमसी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शिवसेनेकडून हर्षाली थविल केडीएमसी मुख्यालयात दाखल झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता पक्षाची जबाबदारी कोणाकडे जाणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजितदादांकडे असलेली अर्थ, क्रीडा, आणि युवक कल्याण मंत्रालय ही खाती राष्ट्रवादीकडेच राहावी, यासाठी हे नेत हे वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहेत.

अकोला महापालिकेत भाजपची सत्ता, महापौरपदी शारदा खेडेकर विजयी

अकोला महापालिकेत महापौर पदाची निवडणूक आज पार पडली. भाजपच्या उमेदवार शारदा खेडेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत महापौर पद मिळवले.

सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या आणि इलेक्शन ड्यूटी (निवडणूक काम) असणाऱ्या शिक्षकांची अडचण झाली आहे. ते लक्षात घेऊन शासनाने ही परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली. 

अजित पवार यांचे विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.28) त्यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्यावर गुरुवारी (ता.29) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. अजितदादांच्या निधनांतर राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. दरम्यान, सरकारने अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे.

अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडणार

अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा आगामी अर्थसंकल्प हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडण्याची शक्यता आहे. अर्थ खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे.

Nagpur NCP : अजित पवारांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात नागपुरात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपुरात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी दोन्ही गट एकत्र आले होते.

राष्ट्रवादीचा झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सभा आणि रोड शो रद्द करण्याचा निर्णय

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सभा आणि रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे उमेदवार फक्त पत्रके वाटून घरोघरी प्रचार करणार आहेत.

अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांड - ठाकरेंची शिवसेना

'ज्या पंतप्रधान मोदी यांनी अजितदादांवर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याच मोदींनी अजितदादांना श्रद्धांजली वाहताना सांगितले, ‘‘अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, सहकार क्षेत्राला त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे खास दूत म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना दादांच्या अंत्यविधीसाठी पाठवले. संपूर्ण शासकीय इतमामात दादांना शेवटचा निरोप देण्यात आला, पण एक मात्र सत्य असे की, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांड, खोटारडेपणाचा कळस होता. दादांवर केलेला कोणताही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, पण सामाजिक जीवनातल्या या नेत्याची यथेच्छ बदनामी केली त्याबद्दल मोदी-फडणवीस हे दादा आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागणार आहेत काय? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून केला आहे.

Nashik : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

नाशिक महापालिकेच्या गटनेते पदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अजय बोरस्ते यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे २६ नगरसेवक आहेत.

Gram Panchayat Election 2026 : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार

जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश धडकले आहे.

महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com