

महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेचे पेपर फोडल्यानंतर आरोपींच्या रडारवर सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेतली जाणारी 'SET' परीक्षा असल्याचा दावा तपासात पुढे आला आहे. या खुलाशामुळे परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा वेगाने तपास सुरू ठेवला आहे.
तपासादरम्यान मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ता याने चौकशीत अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानुसार, प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी देशभरातील विविध मुद्रणालयांतील काही कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात होती. प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
यासोबतच, ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रांवर नियंत्रण मिळवून उमेदवारांना उत्तरे पुरवण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. या संपूर्ण रॅकेटची कार्यपद्धती उघड करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून देशभरातील विविध राज्यांतील दुव्यांची पडताळणी केली जात आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, टीईटीनंतर 'SET' परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरही आरोपींचे लक्ष होते का, याचीही गंभीरपणे चौकशी केली जात आहे. या संदर्भातील पुरावे, संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचीही छाननी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांचे म्हणणे आहे, "देशभरातील मुद्रनालयामध्ये कर्मचाऱ्यांना हाताशी धरून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याचा प्रकार होत असल्याचे" तपासात समोर आले आहे. तसेच, "ऑनलाईन पद्धतीने परीक्षा केंद्रावर नियंत्रण मिळून उमेदवारांना उत्तरे पुरवण्याचाही प्रयत्न केला जातोय" असा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, टीईटी पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धागेदोरे समोर येत असून प्रत्येक खुलाशासोबत तपासाची व्याप्ती वाढत आहे. आरोपींकडून आणखी कोणती माहिती समोर येते, परीक्षेबाबत नेमके कोणते पुरावे मिळतात आणि या संपूर्ण देशव्यापी जाळ्याचा उलगडा कसा होतो, याकडे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि परीक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.