

उद्धव काकडे
Chhatrapati Sambhajinagar : शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीतील कथित गैरप्रकारांच्या तपासणीला आता दुसऱ्या टप्प्यात वेग आला आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीतील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, संचमान्यता तसेच शालार्थ आयडीशी संबंधित संचिकांची विशेष तपासणी एसआयटीच्या पथकाकडून सुरू झाली आहे.
यासाठी विभागातील संचिका छत्रपती संभाजीनगरमध्ये तपासण्याऐवजी थेट पुण्यातील शिक्षण संचालनालय कार्यालयात मागवून घेण्यात आल्या असून, तेथेच या संचिकांची तपासणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ७६४ संचिका पुण्याला पाठवल्या आहेत. त्यामध्ये प्राथमिक विभागाच्या ७६१, तर माध्यमिक विभागाच्या ९०३ संचिकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनीही संचिका पुण्याला पाठविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यापूर्वी पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात २०१९ ते २०२५ मधील पाच जिल्ह्यांतील १० हजार ४९ संचिकांची एसआयटीच्या नऊ अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी झाली होती.
छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यांतील संचिकांचा त्यात समावेश होता. या तपासणीदरम्यान एसआयटीच्या पथकाच्या पंचतारांकित पाहुणचाराचा मुद्दा 'सकाळ'ने उपस्थित केला होता.
पथकाच्या शाही मुक्काम, भोजन आणि इतर पाहुणचाराचा खर्च नेमका कोणत्या तिजोरीतून करण्यात आला, असा सवालही उपस्थित केला होता. दुसऱ्या दिवशी शिक्षण उपसंचालकांनी कुणालाही कार्यालयात न सोडण्याचे फर्मान काढले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील तपासणीसाठी संचिका पुण्यातच मागवून घेतल्याने या प्रक्रियेचे गूढ अधिकच वाढले आहे.
पहिल्या टप्प्यांत २०१९ ते २०२५ मधील संचिकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेच २०१६ ते २०१९ दरम्यानच्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, संचमान्यता तसेच शालार्थ आयडीशी संबंधित संचिका मागवण्यात आल्या होत्या. यावर स्थानिक शिक्षण विभागाने संस्था, शिक्षकांना वैयक्तिक मान्यता, संचमान्यता तसेच शालार्थ आयडीशी संबंधित कागदपत्रांसह संचिका सादर करण्याचे आदेश जारी केले होते.
संपूर्ण यंत्रणेने मागील १५ दिवसांत कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ खर्च केला. त्रुटी आढळलेल्या संस्था, शिक्षकांकडून नव्याने कागदपत्रे मागवून घेत संचिकांचे गठ्ठे आता पुण्याला नेण्यात आले आहेत.
विविध शिक्षण संस्थांमध्ये नियमबाह्य शिक्षक नियुक्त्या, विनाअनुदानितवरून अनुदानित पदांवर झालेल्या बदल्या तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर देण्यात आलेल्या मान्यतांबाबत तक्रारी झालेल्या आहेत. २०१६ ते २०१९ या कालावधीतील संचिकांच्या तपासणीत या तक्रारींची सत्यता पडताळली जाणार आहे. त्यामुळे एसआयटीच्या या दुसऱ्या टप्प्यातील तपासणीत नेमके काय समोर येते आणि त्यानंतर कोणती कारवाई होते? याकडे शिक्षक व शिक्षण संस्थांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.