

Shailesh Balkawade : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लीपनं राज्याच्या राजकारणात धमाका केला आहे. यामुळं महायुतीत भडका उडाला असून शिवसेना आणि भाजप एकमेकांकडं संशयाच्या नजरेनं पाहत आहेत. यापार्श्वभूमीवर या ऑडिओ क्लीपची सत्यता पडताळण्यासाठी आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याची धुरा धडाकेबाज IPS अधिकारी शैलेश बलकवडे यांच्याकडं सोपवण्यात आली आहे.
गेल्या सहा दिवसांपासून जरांगेंनी समोर आणलेल्या या ऑडिओ क्लीपवर घमासान चर्चा सुरु आहे. ही क्लीप बाहेर आल्यापासून त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी या प्रकरणाशी संबंधित सर्वच घटकांकडून केली जात आहे. यामध्ये स्वतः मनोज जरांगे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे नेते या सर्वांनी ही मागणी केली होती.
महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपमधील आपसांत सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर आज मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत या ऑडिओ प्रकरणाचा तपास केला जाईल अशी घोषणा केली. या एसआयटीमध्ये अपर पोलीस आयुक्त, शैलेश बलकवडे (अध्यक्ष) आणि विजयकांत सागर, बजरंग बनसोडे या दोन सदस्यांचा समावेश आहे, अशी ही त्रिसदस्यीय समिती आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं सप्टेंबर २०२३ रोजी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर लाठीचार्जची कारवाई करणारे जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवार पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर शैलेश बलकवडे यांनी त्यांच्या जागेचा पदभार स्विकारला होता. त्यानंतर त्यांनी आंतरवलीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेत मतभेद दूर करण्याचं काम केलं होतं.
शैलेश बलकवडे हे अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी गोंदिया, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि गडचिरोली पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारचे शौर्यपदकही मिळालं आहे. विशेष म्हणजे शैलेश बलकवडे यांच्या पत्नी कादंबरी बलकवडे या IAS अधिकारी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.