Explainer: भिमाशंकरमध्ये गोंधळाचं अन् संशयाचं वातावरण का निर्माण झालं? वृक्षतोड नेमकी कुठे सुरुए? वनखात्याचं म्हणणं काय?

Bhimashankar Forest: भिमाशंकरच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु असल्याचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या विषयावर मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
Bhimashankar Forest Tree Cutting
Bhimashankar Forest Tree Cuttingsarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhimashankar Forest: भिमाशंकरच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु असल्याचे काही व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या विषयावर मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. टोरेंट कंपनीच्या ३००० मेगावॅट वीजनिर्मिती पंप स्टोरेज प्रकल्पासाठी ही वृक्षतोड सुरु असल्याचं आत्तापर्यंत स्पष्ट झालं आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याच्या परवानगीनंतर ही सर्व प्रक्रीया प्रत्यक्ष सुरु झाली.

पण भिमाशंकरचं जंगल जे जैवविविधतेनं समृद्ध अशा पश्चिम घाट भागात मोडतं आणि हा भाग वन्यजीवांसाठी राखीव असल्यानं सुमारे ४०,००० झाडांच्या होणाऱ्या कत्तलींमुळं सर्वसामान्य निसर्गप्रेमी नागरिक हादरुन गेले आहेत. यामुळं मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांचा आणि पर्यावरणाचा असमतोल निर्माण होणार असून यामुळं कधीही भरुन न निघणारं नुकसान होणार असल्याचं वृत्तही विविध माध्यमांमधून प्रसारित होत आहे. पण या ठिकाणाबाबत नेमकं गोंधळाचं आणि संशयाचं वातावरण का निर्माण झालं आहे? भिमाशंकरची जंगलतोड नेमकी कुठे सुरुए? याचा आढावा घेऊयात.

Bhimashankar Forest Tree Cutting
Congress News: काँग्रेसच्या प्रभारींची परीक्षा तीन महिन्यांत! SOP पाठविणार, मूल्यमापनानंतर फेरबदल; विभागवार बैठकांना वेग

वनखात्याच्या गुप्त कारभारानं गोंधळ

स्थानिक पत्रकारानं इथल्या वृक्षतोडींचं व्हिडिओसह वार्तांकन केल्यानं याला विषयाला तोंड फुटलं आहे. तोपर्यंत अत्यंत गोपनियतेनं पर्यावरण विभागाचे क्लिअरन्स मिळवत वृक्षतोडीचं कामही सुरु करण्यात आलं आहे. संबंधित जागेवर जाण्यास वनखात्यानं मनाई केली आहे, तशा मनाई हुकुमाचे बोर्डही त्याठिकाणी लावण्यात आले आहेत. जर या आदेशाचं पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही यातून देण्यात आला आहे. त्यामुळं या प्रकरणात पारदर्शकता नसल्याचा आरोप होत आहे, त्यामुळं या प्रकरणानं चांगलीच उचल खाल्ली आहे.

मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांकडून आणि काही प्रमाणात माध्यमांकडून हा प्रकल्प भिमाशंकरच्या जंगलात होत असल्याचं सांगितलं जात आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "टोरेंट कंपनीचा हा प्रकल्प भिमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून २० किमी अंतरावर आणि वन्यजीव अभयारण्यापासून १५.५३ किमी अंतरावर आहे. हा संपूर्ण प्रकल्प इकोसेन्सेटिव्ह झोनच्या बाहेर होत आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण व वन विषयक परवानग्या १८ महिन्यात कायदेशीर प्रक्रिया करून पूर्ण केल्या आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Bhimashankar Forest Tree Cutting
Raj Thackeray News: "देशातील वाहनांचं ट्राफिक बघून मला देशाचं..."; राज ठाकरेंनी वर्तवलं भाकीत

वन्यजीव विभागाचं गोंधळात टाकणारं स्पष्टीकरण

पण तरीही या वृक्षतोडीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर घनदाट जंगलांमधील हे मोठ्ठाले वृक्ष कटरनं कापले जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं जंगलतोड ही इकोसेन्सिटिव्ह कशी नाही? असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. यापार्श्वभूमीवर वनखात्याच्या पुणे विभागाच्या वन्यजीव उपवनसंरक्षक कार्यालयाकडून सहा ओळींची प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात म्हटलं की, "गेल्या २ ते ३ दिवसांपासून भिमाशंकर अभयारण्यामध्ये एका कंपनीच्या प्रकल्पसाठी अवैध वृक्षतोड सुरु असल्याच्या बातम्या सोशल मीडिया व विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या आहेत. पण भिमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरु नाही. तरी सर्व नागरिकांनी याबाबतची नोंद घेऊन प्रशासनात सहकार्य करावं" असं आवाहन करण्यात आलं आहे. पण यातही पुरेसं स्पष्टीकरण नसल्यानं आणखी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

वनविभाग अन् वन्यजीव विभाग यात फरक काय?

वनखात्यातील सुत्रांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील ज्या सायडोंगर परिसरात सध्या ही वृक्षतोड सुरु आहे ती हद्द अलिबाग प्रादेशिक वनविभागात येते. त्याला जोडून असलेली भिमाशंकर मंदिर परिसराची हद्द ही पुणे प्रादेशिक वनविभागात येते. जिथं दाट झाडी असलेलं जंगल नसतं, कुठल्या प्राण्यांसाठी राखीव असलेलं अभयारण्य नसतं तो संपूर्ण भाग हा प्रादेशिक वनविभागात येतो. तर जो भाग जंगलाचा, जिथं विशिष्ट प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे, तो भाग अभयारण्य म्हणून घोषित असतो. हा वन्यजीव प्रादेशिक विभाग म्हणून ओळखला जातो.

वृक्षतोड नेमकी कुठे होतेय?

त्यानुसार, भीमाशंकर अभयारण्य हे पुणे वन्यजीव प्रादेशिक विभागात मोडतं. त्यातही भीमाशंकर अभयारण्याचे दोन भाग पडतात यातील क्रमांक एकमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग समाविष्ट होतो, तर भीमाशंकर अभयारण्य क्रमांक दोनमध्ये ठाणे, रायगड, जिल्हय़ातील जंगलाचा समावेश आहे. भीमाशंकर अभयारण्य हे प्रामुख्यानं शेकरु या सस्तन प्राण्यासाठी संरक्षित आहे. त्यामुळं सरकारनं या प्राण्यासाठी हा भाग राखीव ठेवलेला असताना तिथं अशा पद्धतीनं वृक्षतोड होत असल्याचा समज असल्यानं जनतेमध्ये रोष आहे. पण सायडोंगर परिसर हा सर्वसाधारण अलिबाग प्रादेशिक वनविभागाचा भाग असून भीमाशंकर अभयारण्याच्या हद्दीबाहेरचा भाग असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com