

Election code of conduct violation : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेने व्हिडिओ जाहिरात लाँच करण्यात आघाडी घेतली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून या जाहिराती टीव्हीवरील विविध वाहिन्यांवर दर काही मिनिटांनंतर 'प्ले' होत आहेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेने, '...इथंच तर आहे माझा लाडका भाऊ', ही भावनात्मक जाहिरात लक्ष वेधून घेत आहे. पण हीच जाहिरात आता एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी अडचणीची ठरू लागली आहे. आम आदमी पक्षाने या जाहिरातीविरोधात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
आम आदमी पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवडणूक जाहिरातीविरोधात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. ही जाहिरात खोटी, दिशाभूल करणारी असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप आपने केला आहे.
'आप'च्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shivsena) 15 जानेवारीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहिन्यांवर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दिला जाणारा पैसा हा सरकारी योजना नसून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक भेट असल्याचा दावा करण्यात आला आहे, याकडे 'आप'ने आता लक्ष वेधले आहे.
'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीमधील लाडक्या बहिणींना दिला जाणारा लाभ वैयक्तिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांचा हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि मतदारांची दिशाभूल करणारा असल्याचे आपचे म्हणणे आहे. सरकारी योजनांमधील निधी हा करदात्यांचा पैसा असतो, तो कोणत्याही व्यक्तीची खासगी देणगी नाही,' असे 'आप'ने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, भाजपने देखील प्रचारासाठी गीत लाँच केलं होतं. परंतु त्यातील भगव्या शब्दावरून राज्य निवडणूक आयोगाने त्याला स्थगिती दिली. हा शब्द बदलण्याच्या सूचना देखील निवडणूक आयोगाने केल्या आहेत. तसंच देवाभाऊ... देवाभाऊ... आणि विकासाची भाजप महायुती, अशा जाहिरीत भाजपने लाँच केल्या आहेत. याशिवाय भाजपने मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने विशेष जाहिराती केल्या आहेत.
भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेने प्रचार जाहिराती लाँच करण्यात बाजी मारली असली, तरी जाहिरनामा मात्र अजून प्रसिद्ध केलेला नाही. जाहिरनामा प्रसिद्ध करेंगे, लेकिन तारीख नही बताऐंगे, असंच काहींसं धोरण भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेने ठेवल्याचं दिसतं आहे. पण मुंबईसह वेगवेगळ्या महापालिकांसाठी विरोधकांनी विशेष करून, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस पक्षाने जाहिरनामा प्रसिद्ध केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.