BJP Political News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला. सुधीर मुनगंटीवार साहेब तुमचा सध्या 'रेस्ट टाईम' सुरू आहे. लवकरच तो संपेल आणि विराट कोहली प्रमाणे तुम्ही राजकीय मैदान गाजवाल, अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.
आर्य समाजाच्या वतीने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुधीर मुनगंटीवार नांदेडमध्ये आले होते. अशोक चव्हाण यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुनगंटीवार यांचे दुःख ओळखून त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. राज्यात बहुमतासह महायुतीचे सरकार आले. 'मी पुन्हा येईन'म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळात अनेकांना धक्का बसला. यापैकीच एक म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार.
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली होती. लोकसभा लढवावी लागणार म्हटल्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नाराजी व्यक्त केली होती. परिणामी त्यांचा पराभव झाला आणि तिथे काँग्रेसचा खासदार निवडून आला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक करत दोनशे पार जागा निवडून आणल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याचा कारभार सोपवला गेला. त्यांच्या मंत्रीमंडळात आपल्याला मानाचे पान मिळेल? अशी अपेक्षा बाळगून असलेल्या अनेकांचा अपेक्षाभंग झाला त्यातचे मुनगंटीवार एक.
मंत्रीमंडळातून डावलल्यानंतर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली होती.आता महायुती सरकारचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. अशावेळी भाजपचे खासदार आणि राज्यातील महत्वाचे नेते अशोक चव्हाण यांनी मुनगंटीवार लवकरच राज्याच्या राजकारणात बॅटिंग करतील, असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुधीर मुनगंटीवार राज्याच्या मंत्रीमंडळात नाहीत, पण क्रिकेटमध्ये किंवा आताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत जसं एखाद्या प्रमुख खेळाडूला काही काळासाठी विश्रांती दिली जाते, तसेच सुधीर भाऊ तुमच्या बाबतीत घडले आहे. सध्या तुमचा रेस्ट टाईम आहे. विराट कोहलीने धुवांधार बॅटिंग केल्यावर जशी त्याला विश्रांती देऊन पुढच्या सामन्यासाठी तयार केले जाते, तसेच सुधीर मुनगंटीवार यांचा रेस्ट टाईम लवकरच संपणार आहे.
ते पुन्हा राज्याच्या राजकारणात जोरदार बॅटिंग करतांना दिसतील, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांच्या राज्याच्या मंत्रीमंडळात कमबॅक होण्याचे संकेत दिले आहे. आता हा रेस्ट टाईम नेमका कधी संपतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.