Rohit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..!
डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून देताना म्हटले होते की, बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा…!आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा.. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज? डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे... ना आनंदाचा जल्लोष…!
गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय…आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.!
अजित पवारांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम करणारे विदीप जाधव यांचाही अजित पवारांसोबत विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी फलटण येथे जात जाधव कुटुंबाची भेट घेतली. ते म्हणाले, जाधव कुटुंबावरही मोठं दुःख कोसळलं. हे दुःख शेअर केल्याने कमी होतं, म्हणून आज फलटण (तरडगाव) इथं जाधव कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचा विश्वास दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.