Pune News : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नुकताच धारावी येथे विराट मोर्चा काढण्यात आला. धारावी पुनर्विकास प्रकल्प गौतम अदानी यांच्या कंपनीला दिल्याचा निषेध करत केंद्र सरकार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचे टीका यावेळेस ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.
गौतम अदानीच्या मुद्द्यावरून अनेक वेळा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती वारंवार टीकास्त्र सोडले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमा दरम्यान गौतम अदानी यांचे आभार मानून त्यांचं कौतुक केले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत.
नुकतेच बारामती येथे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागामध्ये रोबोटिक लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी शरद पवार यांनी गौतम अदानींचे आभार मानले. यावेळी शरद पवार म्हणाले, या प्रकल्पाला पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत. सिफोटेक कन्स्ट्रक्शन कंपनीने १० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे आभार मानतो. तसेच गौतम अदानी यांचे नाव या ठिकाणी घ्यावे लागेल. त्यांनी पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे, या दोघांच्या मदतीने विद्याप्रतिष्ठानमधील प्रकल्प आज या ठिकाणी उभे करणार आहोत”, असे म्हणतात त्यांनी गौतम अदानी यांचे आभार मानले.
याबाबत आता खुद्द सुप्रिया सुळे यांनीच खुलासा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे. आमच्याकडे बस म्हणले की बस आणि उठ म्हणाले की उठ अशी दडपशाही नाही. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही लोकशाहीने चाललेला समूह आहे. आमच्याकडे चर्चा होते भीती दाखवली जात नाही. लोकशाहीमध्ये मतभेद म्हणजे मनभेद असे होतं नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विरोधकांकडून केले जातात नाहक आरोप
यावेळी विरोधकांकडून इंडिया आघाडीचे इतर नेते गौतम अदानींवरती टीका करत असताना पवार मात्र त्यांच्याकडून मदत घेत असल्याची टीका होत असल्याबाबत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, विरोधकांना शरद पवार (sharad Pawar) यांचे नाव घेतल्याशिवाय बातम्या होत नाहीत हे माहिती आहे. त्यामुळे हेडलाईन्स बनवण्यासाठी शरद पवारांचे नाव प्रत्येक ठिकाणी घेतले जाते, अशी टीका सुळे यांनी केली.
(Edited by Sachin Waghmare)