

Shivsena UBT: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित आहे. या सहा खासदारांपैकी एक असलेल्या नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपण अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला आहे. मी माझ्या वडिलांच्या संपर्कात नाही, त्यांच्या शिवसेनेत जाण्याच्या निर्णयाविषयी मला कोणतीही कल्पना नाही, असे कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांना आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या वडिलांचे पिंडदान करुन दाखव, असे आव्हान दिले. त्या शुक्रवारी (१९ जून) शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी सुषमा अंधारे यांना कृष्णा आष्टीकर यांच्या पक्षासोबत असण्याबद्धल विचारण्यात आले. "कृष्णा आष्टीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल तर त्याने उद्या बापाचं पिंडदान करुन दाखवावं आणि स्वत:च्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारुन दाखवावेत, मग आम्ही म्हणू की, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहात. तुम्ही कोणाला शहाणपण शिकवताय. बाप तसा बेटा आहे", असा तीव्र संताप सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
"खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याबद्दल मला जास्त वाईट वाटतं, ज्याला आम्ही आपलं मानलं ज्याच्यासाठी आम्ही लढलो, तो निघून गेला. एकदा विकलेले हे पुन्हा पुन्हा विकले जातात. उद्या अमित शहांनी मोठी बोली लावली तर हे सहा खासदार त्यांच्याकडे जातील. तुमच्याकडे भुंकणारे लोक आहेत. पण माणसं निवडून आणणारे नाहीत. आम्ही ब्रँड तयार करणारे आहोत", अशी टीका सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर केली.
देवेंद्र फडणवीस हे गावठी चाणक्य नाहीत, जे एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. विश्वास कोणावर ठेवायचा हे देवेंद्र फडणवीस यांना माहित असेल, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
तर दुसऱ्याबाजूला कृष्णा पाटील आष्टीकर यांनी देखील सुषमा अंधारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारेंच्या बोलघेवडेपणामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असा आरोप त्यांनी केलाय. तसेच नागेश आष्टीकर यांच्याशी आम्ही देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी हे बंड का केले याची आम्हालाही कल्पना नाही. तसेच पैशांची आम्हाला आवश्यकता नाही, असेही कृष्णा आष्टीकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.