

TET Exam : कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणात परराज्यातील तब्बल पाच जणांचा सहभाग उघड झाला आहे. यावरून या रॅकेटचे साम्राज्य किती खोलपर्यंत रुजले आहे, याचा अंदाज लावता येतो. बिहारच्या रितेशकुमारसोबत ललित कुमार, सलाम, महंमद अशांचा सहभाग समोर आला आहे. या पाचही जणांचा शोध गतिमान करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांचे एक पथक मध्यरात्री बिहारकडे रवाना झाले आहे.
याशिवाय कोल्हापुरात या प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी खटाटोप करणाऱ्यांचाही शोध संशयितांच्या ‘कॉल डिटेल्स’आधारे घेतला जात आहे. यासोबतच मुरगूड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे, मुंबई येथील संशयितांचा शोध घेत आहेत. तपासी अधिकारी उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर हे आज दिवसभर मुरगूड येथे ठिय्या मारून होते. मुख्य संशयित महेश गायकवाड आणि अटकेतील इतर संशयितांकडून अधिकाधिक माहिती घेण्याचे काम ते करीत आहेत.
कागल तालुक्यातील सोनगे येथील एका फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थींना टीईटीचे पेपर देण्यासाठी बोलाविण्यात आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणात 19 जणांना अटक झाली असून, आणखीन 7 जणांचा शोध सुरू आहे. यापैकी 5 संशयित हे परप्रांतीय असून पेपर छपाईच्या ठिकाणाहूनच त्यांनी हे पेपर पुरविल्याचे समोर येत आहे.
गायकवाड बंधूंचं जाळं इतर जिल्ह्यातही पसरलं?
या प्रकरणातील मुख्य संशयित महेश गायकवाड आणि त्याचा भाऊ संदीप गायकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील राहणारे आहेत. हे दोघेही कराड तालुक्यातील बेलवाडी येथे भरती पूर्व प्रशिक्षणासाठीची 'जय हनुमान करिअर अकॅडमी' चालवतात. शिवाय दोघेही भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांचे सख्खे भाऊ आहेत.
महेश आणि संदीप या दोघांनाही अनेक वर्षांपासून पेपर फोडण्याचे हे रॅकेट चालविल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांना आहे. सातारा, कोल्हापूर आणि अन्य कोणकोणत्या जिल्ह्यात या दोघांचा संपर्क होता, याचीही माहिती घेतली जात आहे. यासाठी कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांशी संपर्काला सुरुवात केल्याची माहिती आहे.
‘लाभार्थी’ पोलिसांच्या रडारवर :
छाप्यावेळी जवळपास 180 विद्यार्थ्यांची यादी पोलिसांना मिळाली होती. तसेच हे पेपर विक्री करणारे शिक्षक, एजंटांच्या कॉल रेकॉर्ड आधारे ‘लाभार्थीं’ची माहिती घेतली जात आहे. फोनवरून संपर्क केलेल्यांना पेपरमधील माहिती देण्यात आली होती का?, त्यांच्याकडून किती पैसे उकळण्यात आले? याचीही माहिती घेतली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.