Mumbai News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होवून ४० दिवसांचा कालावधी झाला आहे. दुसरीकडे दिवसेदिवस राज्यातील तापमानासोबतच ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीचा अद्याप सहा जागांचा तिढा सुटलेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसला मुंबईमधील दोन जागेवर उमेदवार भेटत नसल्याने अडचण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला व तर दुसऱ्या टप्प्यासाठी दोन दिवसात मतदान होणार आहे. तरीही महायुतीमधील सहा जागांचा तिढा काही सुटला नाही. महायुतीमधील भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाकडून एकमेकांच्या जागावर दावा केला जात आहे.
विशेषतः महायुतीने मुंबईतील तीन जागेवरील उमेदवार घोषित केले आहेत. तीन जागेवर घोषित करणे बाकी आहे. हा तिढा सुटत नाही तर दुसरीकडे महायुतीत ठाणे, पालघर, नाशिक कोणाकडे जाणार हे ठरत नसल्याने महायुतीचे जागावाटप रखडले आहे.
महाविकास आघाडीची जागावाटप पूर्ण झाले असले तरी दोन मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाहीत. मुंबईतील सहा जागापैकी चार जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या आहेत. त्यांनी त्या जागेवरील उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसने वाट्याला आलेल्या मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर या दोन जागेवरील उमेदवार जाहीर केले नाहीत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमध्ये अधिकृत घोषणा झाली नसली तरीही पाच जागांची वाटप निश्चित झाले आहे. मात्र, मुंबई दक्षिणची जागा भाजपला जाणार की शिवसेना शिंदे गटाला यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उमेदवार कोण हे भाजपाला ठरवता आले नाही. पुनम महाजन सध्या येथून खासदार आहेत. मात्र त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची स्थिती सारखीच आहे. दोन्ही पक्षाला उमेदवार कोण हा प्रश्न सोडवता आलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीत ठाणे आणि पालघर जागेचा निर्णय अद्याप प्रलंबित असून भाजप की शिंदे सेना दोघेही या दोन्ही मतदारसंघावर आग्रही आहेत. त्यापुढे जाऊन नाशिक मतदारसंघातील तिढा कायम असून या ठिकाणी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दावा केला जात असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.