

Uddhav Thackeray Yavatmal Rally News : गद्दारांना सोबत घेऊन भाजप सत्ता उपभोगत आहे. अयोध्येतील राममंदिरातून पैसे, चांदीच्या विटा चोरण्यात आल्या आहेत. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. भोंदूच्या कळपात अडकलेल्या ‘श्रीरामांना’ भाजपामुक्त करायचं आहे, यासाठी ‘भाजपमुक्त राम’ आंदोलनाची पहिली ठिणगी महाराष्ट्रातून पेटवू,’’ असा निर्धार शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शनिवारी (ता. २७) कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर आज यवतमाळ बाजार समितीच्या आवारात उद्धव ठाकरे यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, सूरज चव्हाण, आमदार संजय देरकर, संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, किशोर इंगळे, संजय निखाडे, महिला आघाडी प्रमुख रंजना नेवाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी ठाकरे यांनी यवतमाळकरांची माफी मागत खासदार संजय देशमुख यांच्या पक्षांतरावर टीका केली. शिवसेना प्रमुखांच्या नावावर आणि माझ्या शब्दावर तुम्ही त्यांना निवडून दिले, मात्र त्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला, असे ते म्हणाले. मागीलवेळी ४० आमदार मिंदेनी नेले. आता सहा खासदार पुन्हा पळवून नेले आहे. पूर्वी आमदारांचा भाव ५० खोके होता, आता खासदारांचा भाव किती असेल, असाही टोला लगावत त्यांनी पक्षांतराच्या राजकारणावर निशाणा साधला.
विकास कामाकरिता पक्ष सोडल्याच्या बतावण्या बंडखोर खासदारांकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेत, संविधानात बदल करायचा आहे. आवश्यक बहुमताकरिता हा उठाठेव सुरू असल्याचा आरोप करत हुकूमशाहीविरोधात लढण्यासाठी पुढील तीन वर्षे एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांत विकास केला नाही. तर हे गद्दार काय विकास करतील, असाही टोला त्यांनी मारला.
खासदाराने शेतकऱ्यांसाठी काय केले?
यवतमाळ-वाशीमचे पक्षांतर केलेले खासदार यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, "त्यांना उमेदवारी देण्याची चूक झाली, हे मी मान्य करतो. त्याबद्दल आज मी मतदारांची माफी मागतो. पण त्यांनी खासदार म्हणून कधी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले का? त्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला धारेवर धरले का? असा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेना संपलेली नाही :
शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष संपल्याची टीका करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिले. "काही खासदार पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपत नाही. नमकहराम गेले, पण एकही कट्टर शिवसैनिक पक्ष सोडून गेलेला नाही. यवतमाळ-वाशीम हा शिवसेनेचा गड आहे. गेल्या दोन-चार वर्षांत येथे गद्दारीची कीड लागली आहे. आता ही कीड कायमची गाडण्याची वेळ आली आहे," असे ते म्हणाले.
भाजपमुक्त ‘राम’ करायचा आहे
सर्वसामान्यांच्या कष्टातून उभारलेल्या राम मंदिरात चोरी झाली आहे. कोट्यवधी रुपये तसेच चांदीच्या विटासुद्धा गायब करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या पैशांवर डल्ला मारला जात असेल तर तो हिंदुत्वाचाच अपमान आहे. ही हिंदुत्वाशी गद्दारी आहे. यातून ‘राम‘सुद्धा भोंदूच्या कळपात अडकल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता भाजपमुक्त ‘राम‘ करायचा आहे. या प्रकरणी हिंदू समाजात जनजागृती करण्यासाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आमच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे राहा, असे आवाहन शेवटी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.