Mumbai News : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले. या सहा खासदारानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत जोरदार धक्का दिला होता. ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत निवडून आणलेल्या नऊ खासदारापैकी सहा खासदार फुटल्याने जोरदार धक्का बसला. मात्र, या सर्व घटनाक्रमानंतरही उद्धव ठाकरे शांत राहिले नाहीत. खासदार फोडल्यानंतरही त्यांनी रणनिती बदलत भाजपची कोंडी केली आहे. गेल्या आठ दिवसातच तीन मोठे मुद्दे घेऊन त्यांनी केंद्र सरकारला बॅकफूटवर आणले आहे. त्यांनी भाजपची कोंडी करण्यासाठी समोर आणलेल्या या तीन मुद्द्यांचा ठाकरेंना कितपत फायदा होतो हे कालांतराने स्पष्ट होईल; पण त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपची मात्र कोंडी झाल्याचे दिसून येते.
राज्यातील सहा खासदार फोडल्यानंतर उद्धव ठाकरे शांत राहतील, असा काही जणांचा अंदाज होता. मात्र, नेमके उलट झाले. या सर्व घटनामुळे उद्धव ठाकरे हे अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी खासदार फोडाफोडीच्या प्रकारानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी तातडीने रणनीती आखली. त्यांना कोर्टाच्या माध्यमातून लढा देण्यासाठी एक टीम कामाला लावली. दुसरीकडे त्यांनी शांत बसून राहण्यापेक्षा लगेचच सर्वप्रथम त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगीत झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा तापवून आपली हिंदुत्वाची धार पुन्हा आक्रमक केली. या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारला जेरीस आणले आहे. जागोजागी रामरक्षा आंदोलन करीत भ्रष्टचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई, नागपूर या प्रमुख शहरात आंदोलन केले आहे.
त्यानंतर नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील जंतर मंतर येथे अभिजित दीपिकेच्या सीजेपी पार्टीचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांना पाठींबा दर्शवत केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनाला बळ दिले. एवढेच नव्हे तर या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून भाजपवर टीकेची तोफ डागली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. त्याशिवाय संधी मिळताच त्यांनी २० जुलैला मुंबईत शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करताना राज्य व केंद्र सरकारची झोप उडवली आहे.
त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा बंडखोर खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात विलीनीकरणाची मान्यता देणारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा फायदा ठाकरेंना झाला आहे कोर्टाने या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदाराना नोटीस पाठवून विचारणा कोर्टाने केली आहे. या प्रकरणी खासदारांनी नोटीसीला उत्तर दिल्यानंतर परत सुनावणी होणार आहे.
त्यातच मंगळवारी रात्री सीजीपीचे दिल्लीतील आंदोलन तापल्यानंतर दिल्ली दरबारी जाऊन उद्धव ठाकरे यांनी दीपक दिपकेची भेट घेत वातावरण तापवले आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठींबा दर्शवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी सीजेपीच्या आंदोलनाबाबत भूमिका मांडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एवढयावरच न थांबता महाराष्ट्रातील काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली असून महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांनी राज्यातील भाजपाविरोधात विरोधी पक्षाची मोट बांधली आहे.
त्यानंतर गुरुवारी दिल्लीतील सीजेपी पार्टीच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव व राज ठाकरे या दोन बंधूनी रणनीती आखली आहे. देशभरात सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
ठाकरेसेना आणि मनसेकडून रविवार 26 जुलैला सकाळी दहा वाजता मुंबईत विद्यार्थ्यांसह शक्तिप्रदर्शन मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीशांनी विद्यार्थी आंदोलनातील व्हिडिओ पाहायला वेळ नसल्याचं सांगितल्यावरुनही राज ठाकरेंनी निशाणा साधला. 'झुरळांना जन्म दिला, मग पोराकडे बघायला नको का?' असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. राज-उद्धव ठाकरे एकत्र आंदोलन करणार असल्याने आता केंद्र सरकारची झोप उडाली आहे.
या सर्व घडामोडीमुळे पुन्हा एकदा उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या या सर्व मुद्द्यांचा ठाकरेंना कितपत फायदा होतो हे कालांतराने स्पष्ट होणार आहे. पण त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाची मात्र कोंडी झाल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.