MIM Vs Samajwadi News: राज्यातील मोजक्या वैशिष्ट्यपूर्ण मतदार संघात मालेगाव मध्य चा समावेश होतो. समाजवादी पार्टीच्या नव्या घोषणेने येथील राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत.
मालेगाव शहराचे राजकारण अतिशय गुंतागुंतीचे असते. निवडणुकीचा उमेदवार जाहीर होईपर्यंत येथील मतदार काय करणार? याचा अंदाज कोणालाही नसतो. त्यामुळेच निवडणूक प्रचार सुरू झाला की, येथील मतदारांचा कल स्पष्ट होत जातो.
विशेष म्हणजे मालेगाव शहराचे मतदार कोणाला विजयी करायचे? हे नंतर ठरवतात. आधी कोणत्या उमेदवाराला पराभूत करायचे याचा निर्णय मालेगावकर घेतात. मतदारांचा हा निर्णय होण्यासाठी निवडणुकीची घोषणा व्हावी लागते. असे अन्य कोणत्या मतदार संघात क्वचितच घडते.
सध्या शहरातील राजकारण अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. मात्र या गुंतागुंतीच्या राजकारणाशी मतदारांना काहीही देणे घेणे नाही, अशी उदासिनता मतदारांत आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींचा मतदारांवर फारसा प्रभाव पडेल असे नाही. अल्पशिक्षित असले तरी राजकीय निर्णय घेण्यात मालेगावकर मतदार अतिशय जागरूक असतात, असा आजवरचा अनुभव आहे.
समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याचे जाहीर केले आहे. त्या आधी त्यांनी मालेगाव शहरात (कै) निहाल अहमद यांच्या कन्या शानेहिंद यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत मालेगाव मध्य मतदार संघ काँग्रेस समाजवादी पक्षाला सोडणार का? असा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
येथे एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्माईल हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी यंदा पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार असिफ शेख यांनी देखील नागमोडी राजकीय चाल खेळली आहे.
माजी आमदार शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला, पुढील अडाखे ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाशी त्यांचे सख्या वाढले आहे. त्यामुळेच मंत्री अदिती तटकरे यांचे फ्लेक्स लावून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी त्यांनी केली.
सध्या माजी आमदार शेख याबाबत जाहीरपणे महायुतीबाबत बोलत नाहीत. अपक्ष उमेदवारी करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र जवळच्या कार्यकर्त्यांना माजी आमदार शेख यांचे अप्रत्यक्ष भाजपशी सख्य करण्याचे डावपेच कळल्याने हे कार्यकर्ते दूर जाण्यास सुरवात झाली आहे.
या स्थितीत मालेगाव शहरात एमआयएमचे आमदार मौलाना मुक्ती यांच्या विरोधात आसिफ शेख आक्रमक राजकीय खेळी करीत आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार असा दावा करीत शानेहिंद या देखील निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.
या स्थितीत काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार एजाज बेग कितपत तग धरतील हे सांगता येत नाही. त्यामुळे यंदा मालेगाव शहरात तिरंगी लढत अटळ आहे. यामध्ये आमदार मौलाना मुफ्ती अन्सारी (मोमीन) मतांचा करिष्मा यंदा पुन्हा दाखवू शकतील का? याची उत्सुकता आहे.
शहरातील स्थानिक (दखनी) मतदारांमध्ये माजी आमदार शेख आणि समाजवादी पक्षाच्या शानेहींद यांच्यात विभागणी होते का? यावर आमदार मौलाना मुफ्ती यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. या सगळ्यांमध्ये निवडणूक जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणतीच भूमिका न घेणाऱ्या मालेगावचे मतदार कोणाला पराभूत करण्याचा निर्णय घेतात याची उत्सुकता आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.