

Jalgaon ACB Raid : जळगाव शहरातील मूळ रहिवासी व सध्या अकोला येथे मुंद्राक जिल्हाधिकारी असलेले किरण चौधरी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरीप्रकरणी कारवाई झालेली असून या प्रकरणातील तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.
किरण चौधरी यांच्या जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंट मधील सीलबंद घरामधून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याच चुलत शालकाने केला होता. मात्र, दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली होती. अखेर एसीबीकडून या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.
नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने 'इन कॅमेरा' झाडाझडती घेतली असून या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळली गेली. अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडलेल्या या झाडाझडतीत महत्वाचे दस्तऐवज आणि अन्य साहित्य हाती लागल्याची चर्चा आहे.
गुरुवारी दुपारनंतर नाशिक आणि जळगाव येथील एसीबीच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांचे विशेष पथक साईप्रभा आर्केड येथे धडकले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सीलबंद घर उघडून ‘इन-कॅमेरा’झाडाझडतीला सुरुवात केली. कारवाईदरम्यान अपार्टमेंटमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला होता.
पथकातील अधिकाऱ्यांकडून घरातील प्रत्येक खोलीची झाडाझडती घेण्यात आली. खोलीतील कपाटे, लॉकर, कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घराचा कानाकोपरा तपासून संभाव्य पुरावे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे साहित्य ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. तपासाच्या गोपनीयतेमुळे कोणत्याही अधिकाऱ्याने माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही.
घरातून नेमके काय जप्त केले?
घर झाडाझडतीत ACB ला नेमके काय आढळले, किती कागदपत्रे किंवा इतर साहित्य जप्त करण्यात आले, याबाबत अधिकृत खुलासा अद्याप एसीबीने केलेला नाही. मात्र या कारवाईत तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा तपास यंत्रणांमध्ये सुरू आहे.
मात्र, या घरातून चोरीचा प्रयत्नही झाला होता त्यामुळे किरण चौधरी यांच्या घरात नेमकं असं काय दडलंय ज्याची माहिती अद्याप समोर आली नाही असा प्रश्न पडला आहे. परंतु या झडतीनंतर लाचखोरी प्रकरणातील तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मालमत्ता, संबंधित कागदपत्रे आणि इतर संभाव्य बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा लाचखोर उपनिबंधक किरण चौधरी याला दहा हजारांची लाच घेताना अकोल्यात रंगेहाथ अटक झाली आहे. त्याचा जळगावमधील गणेश कॉलनीतील फ्लॅट एसीबीने सील केलेला असताना घरातील पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या चुलत शालकाने बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला होता. दोघांनी
मध्यरात्री किरण चौधरी याच्या बंद फ्लॅट मध्ये शिरुन एक नेकलेस व काही फाईलीत असलेले पुरावे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच शेजाऱ्यांनी पोलिसांना घटना कळवल्याने दोघांना अटक करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.