Loksabha Electio 2024 : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या चारशे पारच्या घोषणेवर जोरदार टीका केली. शेतकर्यांना रडवलेल्या, महागाईने होरपळलेल्या, बेरोजगारीने त्रस्त झालेल्या यांच्या काळात आता हा जुमला 'अब की पार तडीपार' होणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुक्रवारी समारोप झाला.
या समारोप सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण करत भाजपवर टीका केली. शरद पवार, बाळासाहेब थोरात, रोहित पवार आदींची या प्रसंगी उपस्थित होती.
आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) म्हणाले, 'भाजपची जुमलेबाजी थांबायला तयार नाही. आता सतत कानावर चारशे पारचा नारा येतो आहे. परंतु लोक त्यांना अब की बार तडीपार, असे म्हणत आहेत. देशात परिस्थितीदेखील तशीच आहे. दक्षिण भारतात भाजप एकाही जागावर खाते उघडणार नाही. दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, कन्याकुमारीपर्यंत असे ठरवले आहे की, भाजपला एकाही जागा मिळू द्यायची नाही.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच, 'त्याखालोखाल भाजपची उत्तर भारतातदेखील परिस्थिती खराब आहे. बिहार, राजस्थान आणि झारखंडमध्ये भाजप जेमतेम राहील. महाराष्ट्रात काय परिस्थिती करून ठेवली आहे, हे सर्व तुम्ही जाणता. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला. पवार कुटुंबांच्या घरात भांडणे लावून दिली. भाजपच्या पूर्वीच्या जुमल्याचे नाव गॅरंटी, असे झाले आहे. यामुळे महाराष्ट्रदेखील सावध झाला आहे,' असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
याशिवाय, '15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार, महागाई कमी होणार, डाॅलर रुपयात मिळणार, अशा सर्व जुमलेबाजीपणाला जनता कंटाळली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा जीडीपी म्हणजे, गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्या ऐवजी वाढवून ठेवले आहेत. 2014 आणि 2019ला दिलेली वचने मोदींकडून पूर्ण झाली आहेत का?' असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सभेत उपस्थित केला.
भाजपचे नेते विकासावर प्रचार करत नाहीत. ते मटण, मांस-मच्छी यावर प्रचार करतात. विरोधी पक्ष काय खातो, हे भाजप सरकार पाहत आहे. देशात पुन्हा भाजप आल्यास या देशाचे दुर्दैव असेल, असेही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवले.
याचबरोबर 'भाजपने शेतकऱ्यांना सतत रडवले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली. शेतकरी सतत संकटात असतो. अवकाळीमुळे तर शेती उद्ध्वस्त झाली आहे. परंतु मिंधे सरकारने भाजपच्याबरोबर बसून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. हा बळीराजा या सरकारला कधीच माफ करणार नाही,' असादेखील इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
पुढची पिढी शेतकरी व्हायला तयार नाही. शेतीमालाला भाव नाही. सरकारचे शेतीविषयक धरसोडीचे धोरण. एमआयडीसीत नवा उद्योग नाही. प्रत्येक राज्याच्या वाट्याला जे आहे, ते त्यांनाच मिळाले पाहिजे. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याचे गुजरातला नेले जात आहे. पुत्रप्रेमापोटी शिवसेना फोडल्याच्या अमित शाह यांचा आरोपावर आदित्य ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी वर्ल्डकपची मॅच गुजरातला नेऊन देशाचा वर्ल्डकप घालवला, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, असा टोला लगावला.
'रोजगार नसताना पेपरफुटीचे उद्योग होत आहे. पेपर फोडणारे जेलमध्ये जाऊन येत आहेत. प्रत्येक वर्षी पेपर फोडला जातो. यातून बेरोजगारांच्या स्वप्नांशी भाजप खेळले आहे. युवकांच्या स्वप्नांच्या आड येणारे हे सरकार बदलायचे आहे. महिलांना महाराष्ट्रात सुरक्षित असे वातावणर नाही. मंत्रिमंडळातील मंत्री महिलांचा अपमान करतात. तरीदेखील त्यांच्यावर भाजपकडून कारवाई होत नाही.'
'बिलकीस बानो प्रकरणातील अत्याचारातील आरोपींना गुजरात सरकारने बाहेर काढून त्यांची आरती ओवाळली. ही आपली संस्कृती नसल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी भाजपला चांगलेच फटकारले. मतदान करताना महाराष्ट्रहिताचेच उमेदवार जिंकून देण्याची आता शपथ आपण घेत आहोत,' असेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.