

women and child development department issue : अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक अशा घटना समोर आल्या आहेत. अकोले तालुक्यात 11 वर्षाच्या मुलीची प्रसूती झाली आहे, तर कर्जत तालुक्यातील 13 वर्षांची मुलगी 22 आठवड्यांची गरोदर आहे. दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या, तरी या दोन्ही मुलींवर अत्याचार झाला आहे.
दरम्यान, या मुलींचं बालपण हिरवलं गेल्यानं, महिला व बाल कल्याण विभाग अहिल्यानगर जिल्ह्यात नेमकं काय काम करतं? असा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. 'बेटी बचाव, बेटी पढाव', 'लाडकी बहिणी'च्या नावाने घोषणा देणारे राज्यातील महायुती सरकार, अशा संवेदनशील विषयात कोणती कठोर, पण निर्णायकात्मक भूमिका घेणार का? की फक्त घोषणाबाजीच करणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
अकोले तालुक्याच्या एका गावातील अकरा वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला. अकोले पोलिसांत (Police) संबंधित बालिकेवर अत्याचार करणार्या संदीप मेंगाळ या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी पसार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत गडाख यांनी पोलिसांत तक्रार दिली.
9 ते 10 महिन्यापूर्वी सुगाव बुद्रुक शिवारातून कोणी तरी संदीप मेंगाळ नावाच्या इसमाने सदर पीडित मुलीला पळवून नेवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गरोदर राहून 26 जानेवारीला एका सरकारी रुग्णालयात (Hospital) तिने बाळाला जन्म दिला.
दरम्यान, अकोले तालुक्यात अल्पवयीन मुली गरोदर राहणे, प्रसूती होणे, या घटना वाढत आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 या तीन महिन्यांत 55 अल्पवयीन माता या गरोदर होत्या. तर काहींच्या प्रसूती देखील झाल्या होत्या. याशिवाय मुली पळून जाऊन लग्न करण्याच्या देखील घटना वाढत आहेत. बालविवाहाचेही प्रमाण वाढत चालले असून या सार्या घटना चिंता वाढविणार्या आहेत. परंतु, प्रशासन अन् सरकार याबाबत उदासीन आहे.
कर्जत तालुक्यात घडलेल्या एका बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे समाजाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तिच्याच जवळच्या नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची नोंद बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बाल न्याय (बालकांचे संरक्षण व काळजी) अधिनियम, 2015 अंतर्गत करण्यात आली आहे.
25 ऑगस्ट 2025 सायंकाळच्या सुमारास आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीस फसवणुकीने निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर आरोपीने पीडित मुलीस व तिच्या बहिणीस जीवे मारण्याची धमकी दिल्याने भय, लाज आणि दबावाच्या छायेत ती मुलगी दीर्घकाळ गप्प राहिली व कोणालाही हा प्रकार सांगू शकली नाही.
पण अत्याचाराचे गंभीर परिणाम तिच्या शरीरावर दिसू लागले. मासिक पाळी थांबणे, प्रकृती खालावणे व मानसिक अस्वस्थता यामुळे अखेर कुटुंबीयांच्या लक्षात संशयास्पद बाबी आल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीतून सत्य समोर आले. अवघ्या 13 व्या वर्षी ही मुलगी 22 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून तिच्या मानसिक पुनर्वसनासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. तिच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. संबंधित पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.