
Ahilyanagar municipal corporation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने, इच्छुकांनी आपापल्या प्रभागात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली.
या बैठकीला भाजप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्यानं मिठाचा खडा पडला आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे या बैठकीला उपस्थित असल्यानं, दोघांचा भाजप प्रवेश निश्चित मानलं जात आहे.
भाजपने (BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थानिकच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले, तरी निवडणुकांबाबत कधीही, कोणताही निर्णय होऊ शकत असल्याने, त्याची तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतल्यानंतर, महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नव्हते. विशेष म्हणजे, या बैठकीचे निमंत्रण विखे समर्थकांकडून देण्यात आले.
बैठकीपासून लांब ठेवण्यात आले असतानाच, शिवसेना ठाकरे पक्षाचे आणि इतर पक्षातील माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित राहिल्याने भाजप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटले आहेत. यातच विखे समर्थकांकडून बैठकीचा निमंत्रण असल्याने, संघटना कुठे आहे? यावर आता पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली असून, वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची कुजबुज रंगली आहे.
माजी नगरसेवकांनी या बैठकीत निधीबाबत मंत्री विखे पाटील यांच्यासमोर तक्रारी केल्या. प्रलंबित कामे मार्गी लावण्याची मागणी केली. महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या एकतर्फी कारभारावर देखील माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी कामे मंजूर आहेत, पण त्यावर कार्यवाही होत नाही. मनपा प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात 14 कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असल्याकडे या बैठकीत माजी नगरसेवकांनी लक्ष वेधले.
पावसाळ्यापूर्वी वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर कायम स्वरुपी मार्ग काढण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना नगर शहरातील प्रलंबित कामांवर कामं करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरातील कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन मंत्री विखे यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.