

Cyber Fraud : सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'म्युल अकाउंट' रॅकेटविरोधात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
जिल्ह्यातील विविध बँक खात्यांचा वापर देशभरातील ऑनलाइन फसवणुकीसाठी होत असल्याचे समोर आले असून, या खात्यांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची नोंद देशातील विविध राज्यांत झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
सायबर (Cyber Crime) पोलिसांनी आतापर्यंत संशयितांची चौकशी केली असून, बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगर कार्यक्षेत्रातील काही बँकांमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये देशभरातील सायबर फसवणुकीतील 40 लाख 68 हजार रुपयांची रक्कम जमा झाल्यानंतर ती तातडीने एटीएम किंवा चेकद्वारे काढून घेतल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात खातेदारांनी स्वतःची बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक आणि मोबाईल सिम इतरांना दिल्याचे समोर आले आहे. नगर शहरासह संगमनेर, शिर्डी (Shirdi) , राहुरी, श्रीगोंदा तालुक्यातील बारा जणांच्या बँक खात्यांवर फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. म्युल खात्यांद्वारे सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम फिरवत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार नागरिकांना गुंतवणूक, ऑनलाइन नोकरी, डिजिटल अटक, केवायसी अपडेट किंवा इतर आमिषे दाखवून फसवतात. त्यानंतर लुटलेली रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता अशा 'म्युल अकाउंट'मध्ये वर्ग केली जाते. त्यामुळे मूळ आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी अधिक कठीण होते. अशा प्रकारच्या खात्यांचा वापर देशभरात वाढत असल्याचे तपासांत समोर आले आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, सिम कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले आहे.
म्युल अकाउंट म्हणजे एखाद्या व्यक्तीचे बँक खाते, ज्याचा वापर सायबर गुन्हेगार फसवणुकीतून मिळालेली रक्कम लपवण्यासाठी किंवा पुढे दुसऱ्या खात्यात पाठवण्यासाठी करतात. 'म्युल अकाउंट' (Mule Account) हा सध्या भारतातील सायबर गुन्ह्यांमधील सर्वात गंभीर प्रकारांपैकी एक मानला जातो. अनेकांना "फक्त खाते वापरायला द्या, कमिशन मिळेल" असे सांगितले जाते.
भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक, गुन्हेगारी कट, गुन्ह्यात मदत करणे, गुन्ह्यातून मिळालेल्या मालमत्तेचा व्यवहार करणे गुन्हा आहे. खातेदाराने जाणूनबुजून खाते अशा फसवणुकीसाठी उपलब्ध करून दिले असेल, तर तोही मुख्य आरोपींसोबत आरोपी ठरू शकतो. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (Information Technology Act) अंतर्गत संगणक आणि ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीशी संबंधित तरतुदी लागू होऊ शकतात.
याशिवाय बँक देखील कारवाई करू शकते. बँक खाते तात्काळ गोठवले (Freeze) जाऊ शकते, किंवा खाते बंद केले जाऊ शकते. खातेदाराचे KYC पुन्हा तपासले जाऊ शकते. पुढे नवीन खाते उघडताना अडचणी येऊ शकतात. फसवणुकीची रक्कम मोठी असेल किंवा मनी लॉन्डरिंगचा संशय असेल, तर अंमलबजावणी संचालनालय (ED) Prevention of Money Laundering Act (PMLA), 2002 अंतर्गत तपास सुरू करू शकते. रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.